सिंधुदुर्ग: गेले दोन दिवस मुसळधार पावसाने हाहाकार माजविल्याने कर्ली नदीला पूर आला आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरीच्या वरील २० हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.
तर संबंधित गावांना जोडणारा एकच मार्ग असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. दरम्यान सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि दुकानवाड व आसपासाच्या परिसरात अतिवृष्टी झाल्याने माणगाव खोऱ्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच ११ दिवसांचे गणपती विसर्जन करून माघारी परतणाऱ्या चाकरमान्यांची सुद्धा मोठी गैरसोय झाली आहे.
मळेकाठची भातशेती धोक्यात
गेले दोन-तीन दिवस माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. तर मोठा पाऊस पडल्याने गणपती विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांच्या आनंदावर विरजण पडले. दरम्यान अतिवृष्ठीमुळे येथील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथील शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
२० हून अधिक गावे संपर्कहीन
माणगाव खोऱ्यातील माणगाव बाजारपेठेतून पुढे शिवापूर कडे जाणाऱ्या मार्गावरील आंबेरी येथील ब्रीज पाण्याखाली गेल्याने आंजिवडे, उपवडे, वसोली आदी २० गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.