सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्यानेच झालेल्या चिपी विमान तळाला अखेर वेंगुर्लेच्या सुपुत्राचे अर्थात बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आल्याने बॅरिस्टर यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांच्या कार्याचा एकप्रकारे हा सन्मानच म्हणावा लागेल तसेच सर्वाच पक्षांकडून होणाऱ्या मागणीला अखेर यश आले आहे.
सिंधुदुर्गवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न दोन वर्षापूर्वीच सत्यात उतरले. बहुचर्चित अशा चिपी विमानतळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. त्याच कार्यक्रमात या विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव दिले जावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेकांकडून करण्यात आली होती. तत्कालीन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ही याला दुजोरा दिला होता.
बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व केले होते. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
त्यामुळेच खासदार विनायक राऊत यांच्या प्रमाणेच सामाजिक कार्यकर्ते उमेश गाळवणकर यांनी ही चिपी विमानतळाला बॅ.नाथ पै यांचे नाव दिले जावे यासाठी राज्य सरकारकडे तसेच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सर्वच पक्षांकडून बॅ.नाथ पै यांचे नाव देण्याचा आग्रह होता.त्यातच नव्या सरकार मध्ये उद्योग खाते हे उदय सामंत यांच्याकडे आल्याने त्यांनी या प्रस्तावाला चालना देत हा प्रस्ताव मंत्री मंडळा समोर आणला आणि त्याला मंत्री मंडळाची मंजूरी ही घेतली.
विशेष म्हणजे बॅ.नाथ पै यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून या वर्षांत विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले आहेत असे असतना त्याच वर्षांत बॅ.नाथ पै याचा सन्मान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे बॅ.नाथ पै यांचे संसदेतील कार्य हे अलौकिक असेच होते. बॅ.नाथ.पै यांची संसदेतील भाषणे ही चांगलीच गाजली होती.
कोकणचा एक वेगळा ठसाच त्यांनी उमटवला होता. त्याच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बॅ.नाथ पै यांच्या कुटुंबाने ही जन्मशताब्दी चा कार्यक्रम आयोजित केला असून हा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ला वेंगुर्ले येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच पूर्वी राज्य सरकारकडून चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देऊन एक प्रकारे सन्मानच केल्याचे म्हणावे लागेल.