सावंतवाडी : सावंतवाडी येथील दुचाकी चोरी प्रकरणात चक्क आईच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेल्या सोनुर्ली येथील गौरेश बाळकृष्ण परब यांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली. त्याला निरवडे येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आली.उद्या, बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आपल्याकडे काहीच पैसे नसल्यामुळे आपण हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूली दिली आहे. नोव्हेंबर महिन्यात तो कारागृहातून शिक्षा भोगून सुटला होता.येथील खासकीलवाडा येथील हॉटेल व्यावसायिक हितेन नाईक यांची १० तारखेला मॅगो २ हॉटेल कडून दुचाकी चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार त्यांनी सावंतवाडी पोलिसात दिली होती. त्यानुसार नाईक यांच्यासह सावंतवाडी पोलिस तपास करीत होते. दरम्यान तपासा दरम्यान नाईक यांना संबधित युवक हा आपली दुचाकी घेवून जाताना दिसला. त्यानुसार त्यांनी त्याची माहिती घेतली असता तो सोनुर्ली येथील असल्याचे समजले तसेच तो निरवडे येथे भाड्याने राहत असलेल्या ठिकाणी त्याची गाडी वीना नंबर प्लेट दिसली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत त्याला निरवडे येथील भाड्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता आपल्याकडे पैसे नसल्याने ती गाडी चोरल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली.त्याने दहा वर्षापुर्वी भावाभावांच्या भांडणात आईचा खून केला होता. या प्रकरणी तो गेली दहा वर्षे सावंतवाडी कोल्हापूर, धुळे नाशिक आदी ठिकाणी जेल मध्ये होता. नोव्हेंबर महिन्यात तो सुटला होता. मात्र घरातील व्यक्ती सोबत त्याचे पटत नसल्यामुळे निरवडे येथील एका दुकानात तो काम करीत होता. पैसे नसल्यामुळे आपण हा प्रकार केला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याने आणखी काही गाड्या चोरल्या का? याचा तपास पोलिस करणार आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक गुरूनाथ कोयंडे, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर आदींनी केली.
Sindhudurg Crime: कारागृहातून शिक्षा भोगून सुटला, दुचाकी चोरी प्रकरणात सापडला
By अनंत खं.जाधव | Published: June 13, 2023 7:16 PM