सावंतवाडी : सध्या महाविकास आघाडी सरकारच्या एका एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागत आहे. त्यावरून भविष्यात कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठकच तुरूंगात घ्यावी लागते की काय अशी बोचरी टीका शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडीवर केली. तर, भाजपच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर द्यावेत असे आव्हान देखील दिले. सावंतवाडीत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.आमदार मेटे हे आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेला आले असता त्यांनी सावंतवाडीला भेट दिली. यावेळी शिवसंग्रामचे सिंधुदुर्ग अध्यक्ष सुरेश गवस, उदय भोसले, सत्यजित धारणकर, रजनी निर्मल, विनोद पावसकर, प्रफुल्ल पवार, दिपक कदम, गुरुनाथ कामत आदि उपस्थित होते.मेटे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार हे अन्याय करणारे सरकार असून फॅमिली सरकार आहे. या सरकारला कोणत्याही समाजमनाचे काही पडले नाही. गेल्या अडीच वर्षांत मराठा समाजा बाबत कोणतीही भुमिका घेतली नाही, मराठा समाजातील कोणत्याही नेत्याशी बोलायला याना वेळ नाही. त्यामुळेच आता आम्ही आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. येत्या अधिवेशनात या सरकारला जाब विचारू.अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे ठरलेले असताना या सरकारने गेल्या अडीच वर्षात एक मिनिट ही बैठक या स्मारकाबद्दल घेतली नाही. त्याची कोणतीही पूर्तता केली नाही. फक्त मतांसाठी प्रत्येक घटकाचा वापर केला जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले नाही, ओबीसी समाजाला ही असेच झुलवत ठेवले. मुस्लिम समाजाचा वापर काँग्रेस फक्त मतासाठी करत आला आहे. धनगर समाजालाही सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळेच आता आम्ही शिवसंग्राम च्या वतीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे मेटे यांनी सांगितले.