सावंतवाडी : कबड्डी फेडरेशनचे आजीव सभासदत्व रद्द करण्याच्या उद्देशाने जिवंत व्यक्तीला मृत दाखवून सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांची खोटी कागदपत्रे तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी कबड्डी फेडरेशनचे तत्कालीन कार्यवाह दिनेश चव्हाण यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार केसरकर यांनी बुधवारी पोलिसात दिली त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबड्डी असोसिएशनमध्ये वसंत केसरकर हे आजीव सभासद होते. परंतु ते जिवंत असताना मृत दाखवून त्यासाठी आवश्यक असलेला पूर्तता अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात आला. तसेच त्या ठिकाणी खोटी कागदपत्रे करुन केसरकर यांचे आजीव सदस्यपद रद्द करण्यात आले.
हा प्रकार उघड झाल्यानंतर केसरकर यांनी फेडरेशनच्या पदाधिकार्यांवर आरोप केला होता. तसेच या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत व पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांना चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार केसरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात दिनेश चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत पोलिस निरिक्षक शंकर कोरे म्हणाले, केसरकर यांनी तक्रार दिली होती त्या दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक दर्शनी यात एकच संशयित असल्याचे दिसते. परंतु तपासानंतर अन्य काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे त्यानी स्पष्ट केले.