नाशिक : डुबत्या जहाजावरून शिडात हवा भरलेल्या जहाजात उड्या मारण्याच्या तयारीत असलेल्या विविध पक्षांतील नगरसेवकांना पक्षांतराचे डोहाळे लागले असले तरी नव्या घरी नांदण्यास ओसरीही मिळेल, याची खात्री नसल्याने प्रवेशोच्छुक द्विधावस्थेत आहेत. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या सेना-भाजपामध्ये प्रवेश करण्यास महापालिकेतील सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस, अपक्ष गटातील काही नगरसेवक इच्छुक असल्याची चर्चा जोर धरू लागली असतानाच अधिकाधिक संख्याबळ ओढण्यात सेना-भाजपातही रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. येत्या रविवारी (दि.२७) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेतील सत्ताधारी मनसेसह कॉँग्रेस व अपक्ष गटातील काही नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पक्षांतर सोहळ्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी मनसेला बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून प्रवेशोच्छुक संशयितांना स्थायी समितीवर सदस्यत्वासह प्रभाग सभापतींचे गाजर दाखवितानाच पुढील वर्षी विकासकामांमध्ये झुकते माप देण्याचीही तयारी दाखविली जात आहे.
सर्वांना दरवाजे खुलेभाजपाच्या कार्यपद्धतीवर विश्वास वाढतो आहे त्यामुळे अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. सर्वांना दरवाजे खुले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ हा भाजपाचा मंत्र असल्याने पक्षात काम करणार्यांना भरपूर वाव आहे. भाजपात व्यक्तिकेंद्रित राजकारण चालत नाही. येत्या रविवारी होणार्या मेळाव्यात प्रवेशोच्छुकांची संख्या दिसून येईल. - लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष, भाजपाआयाराम-गयारामांना प्रवेश नाहीअनेक नगरसेवक, पदाधिकारी शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. नव्या वर्षात जानेवारीत शिवसेनेचा धमाका पाहायला मिळेल. मात्र, सेनेत कुणीही येईल अशा आयाराम-गयारामांना प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित प्रवेशोच्छुक किती सक्षम आहेत, त्याला जनाधार किती आहे, याची पडताळणी करूनच पक्षात प्रवेश दिला जाईल आणि त्याला योग्य तो सन्मानही दिला जाईल. सध्या काही पक्षात स्वत:ला प्रस्थापित करू पाहणारे आणि ज्यांचे अस्तित्वच नाही, अशा नेत्यांच्या भरवशावर जाणार्यांचा भ्रमनिरास होईल. - अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना