खारेपाटण : कोविड -१९ च्या काळात खारेपाटण ग्रामपंचायत व येथील नागरिकांनी महसूल तथा संपूर्ण प्रशासनाला चांगले सहकार्य केलेले आहे. यानिमित्ताने खारेपाटण गाव संपूर्ण राज्यभर पोहोचला आहे, असे उद्गार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी खारेपाटण येथील नूतन मंडल कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना काढले.महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने नवीन सजा व मंडल कार्यालये सिंधुदुर्गात मंजूर झाली होती. यामध्ये खारेपाटणला नव्याने मंडल कार्यालय मंजूर झाले होते. या नूतन मडंल कार्यालयाचे तसेच खारेपाटण तलाठी कार्यालयाच्या नूतन स्थलांतरित कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटणच्या शेजारीच या नूतन दोन्ही कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार, खारेपाटण-तळेरे मंडल अधिकारी मंगेश यादव, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम, शेर्पे सरपंच निशा शेलार, कुरंगावणे सरपंच सरिता शेलार, चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भालेकर, महेश कोळसुलकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, मीनल तळगावकर, पोलीस पाटील दिगंबर भालेकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, शंकर राऊत, इस्माईल मुकादम, उपस्थित होते.खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या हस्ते यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर कणवली तहसीलदार आर. जे. पवार यांचाही खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटणकर यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार शेर्पे सरपंच निशा शेलार यांनी मानले.नागरिकांमध्ये समाधानाची भावनाखारेपाटण येथे नव्याने निर्माण झालेल्या मंडल कार्यालयामुळे नागरिकांमध्ये समाधान असल्याची भावना खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी व्यक्त केली. तर भविष्यात निर्माण होणाऱ्या खारेपाटण तालुका निर्मितीस यामुळे अधिक गती व चालना मिळेल असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.
ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपले बँकेचे पासबुक प्रत्येक महिन्याला एन्ट्री मारून त्यावरील रक्कम तपासीत असतो तेवढीच तत्परता जर प्रत्येक नागरिकांनी आपल्या जमिनीच्या नोंदी घडणाऱ्या खातेपुस्तकाबाबत दाखवली तर बऱ्याच अंशी महसुली कामकाज सरळ व सोपे होईल व वारस तपाससारखी प्रलंबित प्रकरणे न राहता जलदगतीने काम होण्यास मदत होईल.- आर. जे. पवार,तहसीलदार, कणकवली