कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ-थोरले मोहुळ येथील शेतकरी धर्माजी जानू खरात यांच्या काजूबागेला व गवताच्या गंजीला बुधवारी रात्री ८ वाजता आग लागून मोठे नुकसान झाले आहे.नाटळ गावची थोरले मोहुळ ही वाडी जंगलापासून नजीकच असल्याने तेथे डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणावर आहे. या डोंगराळ भागाच्या खालीच खरात यांची जमीन, घर तसेच काजू बाग आहे. बुधवारी रात्री घरासमोरच असलेल्या काजूबागेला अचानक आग लागली.
यावेळी घरात खरात यांचे कुटुंबीय होते. त्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी वाडीतील ग्रामस्थ धावून आले. त्यांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर काही वेळाने नजीकच असलेल्या गवताच्या गंजीला आग लागली. त्याचाही भडका उडाल्याचे लक्षात येताच ती आगही आटोक्यात आणण्यात आली.या आगीत खरात यांची काजू कलमे व गवताची गंजी जळाली. खरात हे शेतकरी असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. काजू कलमे व गवतगंजी जळाल्याने खरात यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा उशिरापर्यंत झाला नव्हता. त्यामुळे नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.याबाबत खरात यांनी सांगितले की, ही आग मुद्दामहून लावण्यात आली. आग लावणारा माणूस हा बाहेर गावातील होता. त्याचा पाठलाग करण्यात आला. परंतु तो दुचाकी घेऊन पळाला. त्याने पिवळा शर्ट घातला होता, असेही खरात यांनी सांगितले.