वैभववाडी : हेत-मौदे पर्यायी मार्गावर बुधवारी सकाळी अरुणा प्रकल्पानजीक मोठी दरड कोसळली. विद्यार्थ्यांना घेऊन येणारी एसटी बस वैभववाडीकडे निघाल्यावर ही दरड कोसळली. प्रकल्पस्थळी असलेल्या जेसीबीद्वारे कोसळलेली दरड हटवून मार्ग खुला करण्यात आला.अरुणा प्रकल्पामुळे पूर्वीचा हेत- आखवणे-भोम-मौदे रस्ता बुडीत क्षेत्रात गेल्याने बंद झाला.त्यामुळे प्रकल्पाच्या डाव्या बाजूने मौदेसाठी डोंगरातून रस्ता बनविण्यात आला आहे.परंतु पावसाळा सुरू झाल्यापासून डोंगराचा भाग कमी-अधिक प्रमाणात सतत या नवीन रस्त्यावर कोसळत आहे. त्यामुळे हा पर्यायी मौदे मार्ग धोकादायक बनला आहे.गेल्याच आठवड्यात या मार्गावर एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. परंतु, या आठवडाभरात दोन-तीन वेळा दरड कोसळण्याची घटना घडली.
बुधवारी सकाळी अरुणा धरणाजवळ रस्त्यावर दरड कोसळली. तत्पूर्वीच कणकवली-मौदे एसटी शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन मागे परतली होती. धरणावरील तीन जेसीबीच्या सहाय्याने ही दरड हटवून मार्ग खुला केला. मात्र, सतत कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यायी मौदे मार्गावरील धोका वाढत चालला आहे.