ठळक मुद्देकारकुनाच्या अंगावर खाजकुहिली टाकण्याची घटना देवगड येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये घडला प्रकार
देवगड : देवगड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून शिवराज चव्हाण यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने खाजकुहिली टाकण्याची घटना गुरुवारी दुपारी १२.४५ वा सुमारास घडली. या घटनेने महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, देवगड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीने सराईतपणे व पूर्वनियोजन करून हे कृत्य केले असून, संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.गुरुवारी देवगड तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. दरम्यान, पुरवठा विभागात अव्वल कारकून म्हणून कार्यरत असलेल्या शिवराज चव्हाण यांच्या टेबलाजवळ आलेल्या अज्ञात व्यक्तींनी ते आपल्या कामात व्यस्त असतानाच पिशवीतून आणलेली खाजकुहिली त्यांची मान खाली असतानाच त्यांचा अंगावर टाकून तेथून पळ काढला.दरम्यान, खाजकुहिली टाकून पसार झालेल्या त्या व्यक्तीचा तहसील कार्यालयात कामानिमित्त आलेले भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, आबा तावडे व इतरांनी पाठलाग केला; मात्र, त्या व्यक्तीने देवगड दूरसंचार कार्यालय असलेल्या मार्गाने पळ काढला. तो सापडला नाही. त्यावेळी पुरवठा विभागात कर्मचाऱ्यांसहीत अनेक नागरिक कामानिमित्त उपस्थित होते.चव्हाण यांच्या अंगावर टाकलेल्या खाजकुहिलीचा त्रास त्यांच्याबरोबरच पुरवठा विभागातील इतर कर्मचारी व नागरिक यांनाही झाला. घडलेला प्रकार चव्हाण यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला.प्रशासनात खळबळ अज्ञात व्यक्तीने कर्मचाऱ्याच्या अंगावर खाजकुहिली टाकण्याचा देवगड तालुक्यातील हा पहिलाच प्रकार असून यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही यंत्रणा बसविली नसल्याने त्याचाच फायदा अज्ञात व्यक्तीने घेतला. हे कृत्य करणारी व्यक्ती सराईत गुन्हेगार असून कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्वनियोजन करून तिने हे कृत्य केले असावे, असा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.कारकुनाच्या अंगावर खाजकुहिली टाकण्याची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 7:14 PM