बांदा : राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्याचे निरीक्षक शंकर जाधव यांनी आपल्या पथकासह आंबोली घाटातील पूर्वीचा वस याठिकाणी थरारक पाठलाग करुन बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई करीत ३ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण ११ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. थरारक पाठलाग करताना कारचालकाने कार चौकुळ येथे निर्जनस्थळी टाकून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा येथून आंबोलीच्या घाटातून कोल्हापूर येथे विनापरवाना गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होणार असल्याची पक्की माहिती राज्य उत्पादन शुल्क खात्याचे इन्सुुली तपासणी नाक्याचे निरीक्षक शंकर जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील सहकारी सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत कदम, एस. एस. कदम, शरद साळुंखे, आर. डी. ठाकूर यांच्यासह आंबोली घाटातील पूर्वीचा वस याठिकाणी सापळा रचला होता.शनिवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कार (एम.एच. 0७, एस ४५९९) थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कारचालकाने कार न थांबविता भरधाव वेगात घाटातून कोल्हापूरच्या दिशेने पलायन केले. निरीक्षक शंकर जाधव यांनीदेखील आंबोली घाटात कारचा थरारक पाठलाग केला.
कारचालकाने कार चौकुळच्या दिशेने मार्गस्थ केली. पथकाने पाठलाग न सोडल्याने कारचालकाने चौकुळ येथे एका निर्जन स्थळी कार उभी करुन तेथून जंगलात पलायन केले. कारच्या डिकीची तपासणी केली असता गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे बॉक्स आढळले.पथकाने ३ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचे ४० बॉक्स व ८ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ११ लाख १६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त केला. व अज्ञात कार चालकाविरोधात मुंबई दारुबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला.