कुडाळ : कोकण रेल्वेवर एक ना दोन अशी अनेक विघ्ने येत आहेत. मार्गावरील कोसळणाऱ्या दरडीचे संकट असतानाच कुडाळ येथील रेल्वे ट्रॅकवर अज्ञाताकडून दुर्घटना घडण्यासाठी सिमेंटचे नीस टाकण्यात आले. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत समाजातील विकृतीला समूळ नष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा कोकण रेल्वेचा प्रवास भविष्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांकरिता जीवघेणा ठरु शकतो. या विकृतीला लवकरात लवकर नष्ट करणे गरजेचे आहे.कुडाळातील झाराप मुस्लिमवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर २९ आॅगस्ट रोजी अज्ञात व्यक्तींकडून सिमेंटचे नीस टाकण्यात आले होते. अपघात व्हावा, या दृष्टीकोनातून टाकण्यात आलेले नीस या मार्गावरुन जाणाऱ्या कोकणकन्या रेल्वेने उडवून देत मार्गक्रमण केले. यावेळी रेल्वेच्या मोटारमनला ट्रॅकवर ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या नीसांबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, रेल्वे धडक या नीसांना बसल्यानंतर ही घटना मोटारमनच्या लक्षात आली. कुडाळ स्थानकापुढील मळगाव सावंतवाडी येथील स्टेशनवर पोहोचताच घडलेली घटना मोटारमनने तेथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितली. सावंतवाडी रेल्वेस्थानकातून याची माहिती कुडाळ पोलिसात देण्यात आली. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, सिमेंटचे नीस उखडून रेल्वे रुळावर टाकण्यात आले होते. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अथवा कोणताही पुरावा हाती आलेला नाही. त्यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रेल्वे प्रशासन अशा घटना टाळण्याकरिता कोणत्या उपाययोजना करत नसल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे. आणि उपाययोजना करत असेल तर त्याची अंमलबजावणी होते का पाहणेही गरजेचे आहे. प्रवाशांच्या सोयीकरिता कोकणवासीयांचे रेल्वेचे स्वप्न साकारण्यात आले. मात्र, एकाच ट्रॅकवरुन येजा करणाऱ्या या कोकण रेल्वेसमोर संकटांचा डोंगर उभा ठाकलेला आहे. पावसाच्या सुरुवातीपासूनच कोकण रेल्वेच्या ट्रॅकवर डोंगर खचून दरडी कोसळत आहेत. यामुळे मार्गात अडथळे निर्माण होत असून गाड्यांचे वेळापत्रकही ढासळत जात आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही डोळ्यात अंजन घालून काम केले पाहिजे. कारण त्यांच्यावर हजारो प्राणांचा भार वाहिला जात आहे.विकृत प्रवृत्तीला आळा घालण्याची गरजकोकण रेल्वेच्या झाराप मुस्लिमवाडी येथील ट्रॅकवर सिंमेटचे नीस टाकणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकापेक्षा जास्त व्यक्तिंचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या समाजविघातक विकृत प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा, यावेळी वेळ चुकवून गेला दुदैवी प्रसंग पुढच्यावेळी संधी देईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे वेळीच सावध होणे आवश्यक आहे. पोलिसांनी अशा व्यक्तिंच्या मागावर राहत त्यांना अटक करुन शिक्षा दिली पाहिजे. (प्रतिनिधी)रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेतही त्रुटीकोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी चांगली सोय केली आहे. मात्र, सुरक्षेच्यादृष्टीने अनेक त्रुटी आढळून येत आहे. एखाद्या स्टेशनवर चार ते पाच तिकीट तपासणीस आढळतील मात्र, त्याच स्टेशनवर सुरक्षारक्षक एकच आढळून येतो. जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर कायमस्वरु पी सुरक्षारक्षक आवश्यक आहेत. जंगल परिसरातील भागात कमी अंतराकरिता ट्रॅकमन ठेवणे गरजेचे आहे. अपघात घडला अथवा अन्य काही घडल्यास घटनास्थळी तेथील पोलीस पोहोचतात. मात्र, रेल्वेचा सुरक्षारक्षक पोहोचत नाही. याकडेही रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने पाहिल्यास त्यांना चुकांचे आकलन होईल. अपघात न होण्यासाठी काळजी आवश्यकरेल्वे रुळांनी सातत्याने पाहणी केली गेल्यास अपघाताच्या घटना घडणारच नाहीत. जंगल भागातील ट्रॅकचीही कसून पाहणी होणे गरजेचे असून रेल्वेच्या ट्रॅकबाबत छोटीशी बाबही गांभीर्याने घेण्यात आल्यास अशा घटना घडणार नाहीत.
कुडाळातील घटना : रेल्वे ट्रॅकवर नीस टाकणाऱ्यांना शिक्षा आवश्यक
By admin | Published: August 31, 2014 9:53 PM