कणकवली : कणकवली तालुक्यातील साळिस्ते, शिडवणे, तळेरे येथील सात बंद घरे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री फोडली आहेत. त्यामधील तीन घरातील रोख रक्कम व सोने, चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य असा सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. या घरफोडीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तळेरे येथे राहणारे नरहरी रघुनाथ पावसकर यांच्या वहिनीच्या घराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. विलासिनी पावसकर या साळीस्ते येथील त्यांचे घर कुलूपबंद करून सुमारे एक महिन्यापूर्वी अंधेरी, मुंबई येथे राहायला गेल्या आहेत.
तर साळीस्ते येथील सहदेव सावळाराम गुरव व प्रभावती वासुदेव गुरव, शिडवणे गावातील वसंत कोथंबीरे, प्रकाश शंकर मिसाळ, विजय महादेव टक्के, तर औदुबरनगर येथील सुधीर शशिकांत आरोलकर यांचे राहत्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश करुन चोरी करण्यात आली आहे. काही घरात चोरट्यांना काहीच आढळले नाही. शिडवणे कोनेवाडी येथे राहणारे विजय महादेव टक्के यांच्या घरातील ८० हजार रुपये रोख, सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांचा पुतण्या सुशांत टक्के याने पोलिसांना सांगितले. विजय टक्के यांच्या घरातील ८० हजार रुपये रोख रक्कम , ८६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, कानातील कुडी, मोत्याचा हार, चांदीचे तांबे असा मुद्देमाल चोरीस गेला. तसेच सुधीर आरोलकर यांच्या घरातील २५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेलेली आहे. या घटनेची माहिती कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
फेरीवाल्या विक्रेत्यांवर संशय !सध्या गावोगाव फेरीवाले विक्रेते विविध वस्तू घेऊन फिरत आहेत. या चोरिमागे त्यांचाच हात असण्याची शक्यता वर्तवली जात असून इतरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.