वैभववाडी (सिंधुदुर्ग) : तळेरे - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी करुळ घाट मार्गाची वाहतूक पूर्णतः बंद केल्यामुळे करूळ गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे वैभववाडी ते करूळ घाटपायथ्यापर्यंत एसटी बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी करूळ ग्रामस्थ, विद्यार्थी व प्रवाशांनी वैभववाडी वाहतूक नियंत्रकांकडे केली आहे.याबाबत करूळचे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक भागोजी गुरखे यांना निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबन सावंत, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते अनंत कदम, ग्रामपंचायत सदस्य रेखा सरफरे, माधवी राऊत, रवींद्र सरफरे, राजू कदम, दिलीप कदम, दीपक लाड, उदय सावंत, जगन्नाथ चव्हाण, जितेंद्र गुजर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तरेळे - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर चालू आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने करूळ घाट मार्गावरील वाहतूक भुईबावडा व फोंडा घाट मार्गे वळविण्यात आली आहे. करूळ घाटाची वाहतूक पूर्णतः बंद केल्यामुळे या मार्गावरील करूळ गावातील प्रवाशांची खूपच गैरसोय होत आहे. वैभववाडीत शाळा, महाविद्यालयात तसेच शासकीय कामासाठी येणारे विद्यार्थी, प्रवासी व नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईपर्यंत वैभववाडीतून करूळ घाटपायथ्यापर्यंत सकाळी १०:०० वाजता, दुपारी १२:३० वाजता व संध्याकाळी ५:०० वाजता अशा तीन बसफेऱ्या तातडीने सुरू करुन विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, असे निवेदनात म्हटले आहे.