सावंतवाडी : कोट्यवधी रुपये खर्च करून आंबोली-कावळेसाद येथे बांधण्यात आलेली रेलिंग कमी उंचीची आहेत. यामुळे गतवर्षी दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघाताला सर्वस्वी बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत कावळेसादमधील रेलिंगची उंची वाढविण्याची कामे करा; अन्यथा या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी करावी, अशी मागणी गुरुवारी कावळेसादसह आंबोली ग्रामस्थांनी केली आहे.आंबोलीतील पर्यटनाच्यादृष्टीने करण्यात आलेल्या कामांबाबत ग्रामस्थांना विचारात घेतले नाही. त्यामुळे आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांनी चुकीच्या कामांविरोधातही वेळोवेळी सूचना व आंदोलने केली आहे. मात्र, त्यानंतरही ही कामे त्याच पद्धतीने सुरू राहिली. कावळेसाद पॉर्इंटवर बांधकाम विभागाने रेलिंग उभी केली आहेत. या रेलिंगची उंची कमी असून, या रेलिंगमुळे एखादा पर्यटक जर कावळेसादच्या दरीचा आस्वाद घेण्यास उभा राहिला, तरीही तो तोल जाऊन दरीत पडू शकतो, अशी शक्यता नागरिकांतून वर्तवली जात आहे. गतवर्षी विजापूर व कोल्हापूर येथील पर्यटक पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी कावळेसाद येथे आले असता त्यांना जीव गमवावा लागला आहे. तसेच येथील डोंगरावरील पाणी मोठ्या पाईपद्वारे दरीत सोडण्यात येते. त्या मोठ्या पाईपना जाळ्या नसल्याने हा पर्यटक थेट त्या पाईपमधून वाहून जाऊन दरीत कोसळला होता. या प्रकारामुळे पाईपना जाळी बसवण्याबरोबरच रेलिंगची उंची वाढवणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)जाळी बसविण्याची मागणीआंबोली परिसरात हजारो पर्यटक पर्यटनासाठी दाखल होत असतात. मात्र, अशाप्रकारच्या घटना घडल्यानंतरही त्या ठिकाणी योग्य उपाययोजना न केल्यास पर्यटकांमध्ये घट होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित पर्यटनासाठी कावळेसाद पॉर्इंट निर्भय करण्यासाठी या रेलिंगची उंची वाढवण्याची व जाळी बसविण्याच्या कामांना सुरुवात करण्याची मागणी केली आहे.
रेलिंगची उंची वाढवा
By admin | Published: February 19, 2015 9:55 PM