सिंधुदुर्ग : कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुरक्षा रक्षकांच्या मानधनात वाढ करावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत केली.विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी विविध प्रश्न मांडले. सहा दिवसांच्या काळात लक्षवेधी, विशेष उल्लेख, पुरवणी मागणी आदी आयुधाद्वारे कोकणातील विविध समस्यांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यात पर्यंटकांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षकांना अत्यल्प मानधन दिले जाते. त्यामुळे या पदावर काम करण्यास तरुण इच्छूक नाहीत. अत्यल्प व अनियमित मानधनामुळे सुरक्षारक्षकांसाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकांचे वेतन, पर्यवेक्षकांचे मानधन आणि गस्ती नौकांचे भाडे आदींसाठी वाढीव तरतूद करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील खारेपाटण, शेजवली, वाल्ले, बांदीवडे, प्रिंदवने, उपळे, तारळ, कुंभवडे, नाणार, कात्रादेवी, शिरसे रस्ता, बोंदीवडे येथील कॉजवेच्या ठिकाणी लहान पुलाचे बांधकाम व संरक्षण भिंतीचे काम करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी निधी देण्याचा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला.चिपळूण तालुक्यातील टेरव येथील जय भवानी वाघजाई ग्रामदेवता तिर्थस्थळाला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा, भारताचे पहिले अर्थ मंत्री सी. डी. देशमुख यांच्या महाड तालुक्यातील नाते येथे जन्मगावात उभ्या करण्यात येणाऱ्या स्मारक व भव्य ग्रंथालयाच्या बांधकामासाठी वाढीव निधी मंजूर करावा, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.वसतीगृह निर्वाह भत्ता कार्यक्रमांतर्गत कोकणातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी वाढीव निधी, दिव्यांग शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, कायम विनाअनुदानित शाळांना १०० टक्के वेतन अनुदान, एस. टी. महामंडळाच्या जुन्या बसदुरुस्तीसाठी वाढीव तरतूद, जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांना वाहन, नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भाड्यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा नवीन इमारत बांधकामासाठी वाढीव निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल कोकणातील भातउत्पादक शेतकरी, मच्छिमार आदींना भरघोस मदत करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली.आर्द्रतेवर आधारित विमायोजनेतून फसवणूकखासगी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांसाठी नवे नियम लागू केले जातात. काही वर्षांपूर्वी हवामानावर आधारित विमा योजना होती. मात्र, गेल्या वर्षापासून आर्द्रतेवर आधारित विमा योजना लागू करण्यात आली. त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी सरकारचे लक्ष वेधले.