कणकवली : कधी तापमान वाढते तर कधी कमी होते. कधी ढग दाटून येतात, तर कधी पावसाचा शिडकावा होतो. काही तासांत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे याचा त्रास सिंधुदुर्गवासीयांना होत आहे. त्यातच शनिवारी ३६ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढलेले असतानाच जिल्ह्यात ठिकठिकाणी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. काही प्रमाणात तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी पुन्हा तापमानात वाढ झाली. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात अधून मधून ढगाळ वातावरण असते. मात्र, असे दिवस वगळता पडलेल्या कडक उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कडक उन्हाचा सामना करत असताना तापमान अचानक वाढत असून मध्येच कमीदेखील होत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.
शनिवारी, ११ मे रोजी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. जोराचा वारा वाहून पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे तापमान ३० अंश सेल्सिअसवर गेले. लगेच दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे शनिवारच्या पावसामुळे दिलासा मिळणे दूर राहून उलट रविवारी उकाडाच जास्त जाणवला.
रुग्णसंख्येत वाढ!उन्हाळा सुरू असूनही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्याबरोबर दमट हवेचा सामना करावा लागत आहे. जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते, तेव्हा आपल्या शरीरातही काही बदल होतात. यात डिहायड्रेशन होणे, उष्माघात होणे, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, ॲसिडिटी होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे असे आजार उद्भवत आहेत. दरम्यान, शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यातील जास्त रुग्ण उष्णतेबाबतच्या समस्येबाबत येत आहेत.जोरदार पावसाच्या सरी !कणकवलीसह जिल्ह्यातील काही भागात रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जोरदार वारा सुटला. त्यानंतर आकाशात विजा चमकू लागल्या काही वेळातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या, तर काही भागात तत्पूर्वी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला.
...असे होतंय कमी- जास्त तापमान!वाढत जाणारे तापमान आणि ढगाळ वातावरण यांचा परिणाम तापमानावर होत आहे. त्यामुळे कमान व किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.