प्रथमेश गुरववेंगुर्ला : सध्या दिवाळीच्या सुट्यांचा हंगाम असून बऱ्याच घराघरामध्ये पै-पाहुण्यांचे आगमन झाले आहे. दिवाळीच्या फराळा सोबतच घरातील अबालवृद्धांसोबत गप्पागोष्टीत रमताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा ही आस्वाद पाहुणे मंडळींकडून घेतला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच समुद्रकिनारी सध्या गर्दी दिसून येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किनाऱ्यांची मिळणारी माहिती, पारंपरिक खाद्यपदार्थ, स्थानिकांकडून पर्यटकांना मिळणारे आपुलकीचे आदरातिथ्य यामुळे समुद्रकिनाऱ्यांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
रोजगार मिळण्याची आशादिवाळीच्या सुटीनंतर काही दिवस पर्यटन कमी होण्याची शक्यता असली तरी येत्या काही दिवसांतच नाताळ आणि ३१ डिसेंबर जवळ येत आहे. त्यामुळे काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पर्यटनाला बहर येणार आहे. सध्याचा रोजगार हा हंगामी स्वरूपाचा असला तरी दिवसेंदिवस होणारे बदल आणि पर्यटकांची वाढत जाणारी गर्दी यामुळे भविष्यात निश्चित स्वरूपाचा रोजगार हा किनारी रहाणाऱ्या लोकांना मिळणार असल्याची चिन्हे आहेत.
झुलता पूल पर्यटनवाढीतील दुवावेंगुर्ला शहर आणि नवाबाग यांना जोडणारा झुलता पूल पर्यटनवाढीसाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे. सागरेश्वर बिचवरून पर्यटक या झुलता पुलावर हजेरी लावत नजिकच असलेल्या नवाबाग खाडीत जाऊन मनसोक्त आनंद लुटत आहे. तर अलिकडे याचठिकाणी समुद्रात झालेल्या बंधाऱ्यावरून ही फेरफटका मारण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. हे सर्व निसर्गसौंदर्य ‘सेव्ह’ करून ठेवण्यासाठी फोटोसेशन, व्हिडीओ शुटींग, सेल्फी यालाही प्राधान्य दिले जात आहे. हे सर्व प्रत्यक्ष कृतीतून घडविण्यासाठी तासनतास पर्यटक याठिकाणी थांबत आहे.
वेंगुर्ल्यात स्थानिकांच्या रोजगारामध्येही वाढ
- गेली काही वर्षे ‘पर्यटन’ संकल्पना रूजू होत असतानाच शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत बरेच बदल घडून आले आहेत आणि बदल होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, स्वच्छ हवा यामुळे पर्यटक अशा भागांना पसंती देत आहेत.
- निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत असताना पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी स्थानिक लोकांनी आपापले रोजगार सुरू केले आहेत.
- पारंपरिक वडापाव आणि भेळपासून ते गोबी मंच्युरीयन पर्यंत खाद्यपदार्थ पर्यटकांना उपलब्ध झाले आहेत. पर्यटकांचा ही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे.