सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना पक्षांच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊन आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून ८ ते १0 जानेवारी या कालावधीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत.देवगड ग्रामीण रुग्णालय येथे चुकीच्या इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे ९ जानेवारीला आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. या आंदोलनास विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे काँग्रेसच्या काळातील गुन्हे प्रकरणांचा तपास न लागल्यामुळे आंदोलन छेडणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेतर्फे छेडण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण होऊन आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) प्रमाणे ८ ते १0 जानेवारीपर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत.या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी कोणतीही वस्तू बाळगणे, कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीची किंवा आकृती किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार करणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित जमा होणे, मिरवणुका काढण्यास मनाई केली आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गात मनाई आदेश
By admin | Published: January 08, 2016 11:55 PM