राजन वर्धन - सावंतवाडी -देशाचा ६८ वा स्वातंत्र्यदिन शनिवारी साजरा होत आहे. देशातील जनतेचा सर्वांत आनंदाचा दिवस म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण या दिवशी करण्यात येणारी विविध आंदोलने, उपोषणे यामुळे स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व लोप पावण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय करण्यात येणारी ही आंदोलने संबंधित मागण्यांसाठी तळमळ आहे की, कोणाची अडवणूक आहे, याबाबत शंका उपस्थित होत असली तरी यामुळे प्रशासन मात्र वेठीस धरले जात आहे. राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिनाला देशात मानाचे स्थान आहे. शिवाय शेजारील देशांसह जगातही भारताच्या स्वातंत्र्य दिनाविषयी कुतूहल आहे. या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले. अनेकांनी कारावास भोगला, तर अनेकांना भूमिगतही व्हावे लागले; पण याची कसलीही तमा न बाळगता या सर्वांनी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाची मुक्तता केली. हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून शाळा, महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयासमोर तिरंगा ध्वज फडकवून साजरा केला जातो. या दिवशी शासकीय व अलीकडे खासगी क्षेत्रातही सुटी जाहीर झाली करण्यात आली आहे. जेणेकरून हा दिवस सर्वांनी आनंदात घालवावा.पण, देशवासियांच्या या आनंदाच्या दिवशी आंदोलने करण्याचे प्रकार गेल्या तीन-चार वर्र्षात वाढले आहेत. व्यक्तिगत, सामाजिक व सार्वजनिक मागण्यांसाठी विविध आंदोलने करण्याचे इशारे दिले जात आहेत. तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी व आता खुद्द विधिमंडळातसुद्धा याचे पेव पसरत आहे.सावंतवाडी तहसीलदारांकडे या स्वातंत्र्य दिनादिवशी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दहाजणांनी केवळ उपोषण करण्यासाठी इशारा दिला आहे. यामध्ये साटेली-भेडशीतील जाधव व दलित बांधव, सावंतवाडीतील चराठा-नमसवाडी येथील शंकर कोठावळे, डेगवेतील संजय देसाई, तळवणेतील वासुदेव जाधव, सावंतवाडी-सालईवाडा येथील सूर्यकांत गवंडे, माणगाव येथील बी. पी. कांबळे, आंबेगाव येथील दक्षता परब, सावंतवाडी-वैश्यवाडा येथील प्रदीप नाईक, न्हावेलीतील सद्गुरू सावळ यांचा समावेश आहे. तर सावंतवाडी प्रांत कार्यालयाकडे सावंतवाडी तालुक्यातील पाच, दोडामार्ग तालुक्यातील तीन, तर कुडाळ तालुक्यातील एक असे नऊ उपोषणाचे इशारे आले आहेत. वास्तविक पाहता उपोषण करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असतीलही; पण स्वातंत्र्य दिनाला उपोषणासारखा गंभीर आंदोलनाचा मार्ग पत्करणे योग्य नाही. तर या मागण्यांतील संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली टाळाटाळही तितकीच गंभीर आहे. या अधिकाऱ्यांनाही वरिष्ठांनी चाप बसविणे गरजेचे आहे. एकीकडे ‘देशाचा स्वातंत्र्य दिन चिरायु होवो’ म्हणायचे आणि दुसरीकडे येथील नागरिक व अधिकाऱ्यांनी यादिवशी उपोषणासारखे कृत्य करणे अशोभनीय असेच आहे. एकंदरीत यामुळे शालेय मुलांना आपण या दिनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पहाटे उठवून त्याला नटवून शाळेत पाठवतो. पण, या दिनाचे महत्त्व आपणांकडून धुळीस मिळविले जाऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे, अन्यथा देशाच्या आनंदाच्या या दिवसाचे महत्त्व भविष्यात लोप पावण्याचीही भीती आहे. ग्रामसभाही वादळी : प्रशासनाची कोंडीया राष्ट्रीय सणादिवशी ग्रामसभाही आयोजित केली जाते. अलीकडे सर्वच गावातील ग्रामसभांमध्ये वादावादी होत असल्याचे प्रकार सर्रास पाहावयास मिळतात. त्यामुळे ज्या आनंदोत्सवासाठी हा दिवस असतो त्या आनंदाऐवजी हा दिवस वादाचा होतो. त्यामुळे प्रशासन, त्यातही पोलीस प्रशासनाची फार मोठी कोंडी होते.
स्वातंत्र्यदिनी उपोषण, तळमळ की अडवणूक ?
By admin | Published: August 13, 2015 11:57 PM