सिंधुदुर्ग- लेबनान येथे २२ देशांच्या राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स - २०२१ या स्पर्धेमध्ये मुळची मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील असलेली श्रीया परब मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ ची विजेती ठरली. या स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले होते. या तिच्या यशाबद्दल पुन्हा एकदा जिल्ह्याची मान देशात उंचावली आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. (India Malvan's Shriya Parab Miss Tourism Universe Asia 2021 winner)
मूळची मालवणची असलेली श्रीया संजय परब ही पहिल्या दिवसापासूनच आपल्या तयारीवर लक्ष देऊन होती. तिच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने आणि सर्वाना घायाळ करणाऱ्या सौंदर्याने इतर सहभागी स्पर्धकांच्या मनात धडकी भरवली होती. अंतिम फेरीदिवशी श्रियाच्या सर्व सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकून घेतली आणि तिने मिस टुरिसम युनिव्हर्स आशिया २०२१ हा किताब पटकावून लेबनानमध्ये तिरंगा फडकवला.
मुंबई येथे ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या मिस तियाराची विजेती झाली. या स्पर्धेत देशातून विविध स्पर्धक सहभागी झाले होते. विजेतेपद मिळाल्याने लेबनॉनमध्ये झालेल्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायची सन्धी मिळाली. विजेत्या श्रियाचे नाव ऐकून सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.
मिस अप्सरा श्रीया -2017 मध्ये झालेल्या मिस अप्सरा महाराष्ट्रची श्रीया अंतिम विजेती ठरली होती. तर मिस एशिया पॅसिफिक मध्ये रनर अप हा किताब पटकावला. मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ या स्पर्धेमुळे श्रीयाने देशाचे नाव चमकवले आहे.
श्रियाने तिच्या यशाचे सर्व श्रेय तिचे पालक, तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक ऋषीकेश मिराजकर यांना दिले आहे. ती मुंबईमध्ये आल्यावर तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रियाच्या ह्या यशाने अनेक तरुण मॉडेल्सना एक आदर्श घालून दिला असून ती अनेक तरुण तरुणींचे प्रेरणास्थान ठरेल यात शंकाच नाही. श्रियाच्या ह्या यशाने फक्त मालवणच नाही, तर समस्त सिंधुदुर्गवासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्रिया परब आणि कुटुंबियांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.