सावंतवाडी : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री म्हणून सिंधुदुर्गचे सुपूत्र असतानाही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक उद्योग बंद झाले. त्यांचा पाठपुरावाही येथील माजी आमदार दीपक केसरकरांना करता आला नसल्याचा आरोप मनसेचे उमेदवार परशुराम उपरकर यांनी रेडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत केला आहे. यावेळी त्यांनी टाटा मेटालिक बंद होण्यामागे कोण आहे ते शोधून त्याला धडा शिकवा, असे आवाहन केले.यावेळी वेंगुर्लेचे मनसे तालुकाध्यक्ष आनंद वेंगुर्लेकर, धीरज परब आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सर्व समावेशक आहे. येथे विकास करण्यासाठी भरपूर वाव असतानाही केसरकरांनी केवळ इतरांवर टीका करण्यात वेळ दवडला. त्यांना जनतेचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्यांनी काम केले असल्यास ते जनतेसमोर मांडावे, असे आव्हानही त्यांनी दिले. सावंतवाडी मतदारसंघात अनेक उद्योगधंदे बंद होते. रेडीतील टाटा मेटालिक, उषा इस्पात, दोडामार्ग मधील कोल कंपनी अशा कंपन्या बंद झाल्या आहेत. या कंपन्यामधील कर्मचारी बेरोजगार झाले असून याबाबत कोणालाच काही वाटत नाही, हे दुदैव आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नवीन उद्योग आणले नाहीत आणि असलेले त्यांना टिकवता आले नाहीत, असा आरोपही केला. मतदार आता साक्षर असून आश्वासनातील खराखोटेपणा चांगला कळतो. राणेंना धडा मिळाला असून आता दीपक केसरकरांनाही धडा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)
उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यात उद्योग बंद
By admin | Published: October 02, 2014 9:56 PM