मालवण : सिंधुदुर्ग किनारपट्टीवर विनापरवाना पर्ससीन (मोठे ट्रॉलर्सधारक) मासेमारीचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. वेंगुर्ले तालुक्यात दीडशे ते दोनशे अनधिकृत मिनी पर्ससीन नौकांकडून पारंपरिक मच्छिमारांच्या सागरी क्षेत्रात मासळीची लयलूट केली जात आहे. याबाबत मत्स्य विभाग सुस्त असून, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पर्ससीनप्रश्नी दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांचे आदेश झुगारून मासेमारी सुरू आहे. येत्या आठ दिवसांत संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वेंगुर्ले व मालवण येथील पारंपरिक मच्छिमारांनी दिला आहे. वेंगुर्ले किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीन मासेमारी सुरू असताना मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाईची पावले उचलली जात नसल्याने वेंगुर्लेतील संतप्त पारंपरिक मच्छिमार संघटनेच्या प्रतिनिधींनी मालवण येथील सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालयावर धडक दिली. मात्र, रिक्त पदांच्या गर्तेत राहिलेल्या या कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने मच्छिमारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. उपस्थित असणारे काही कर्मचारी समुद्री गस्तीवर गेल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मत्स्य कार्यालयावर धडक दिलेल्या वेंगुर्ले व मालवण येथील पारंपरिक मच्छिमारांनी काहीकाळ ठाण मांडले होते. कारवाई करून नौका ‘सील’ करावेंगुर्ले किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांच्या सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी आजही सुरू आहे. त्या मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य विभागाचे सहायक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांना दूरध्वनी करून सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अनधिकृत म्हणून पकडण्यात आलेल्या नौका त्याच ठिकाणी ‘सील’ कराव्यात. प्रसंगी पोलिस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोलून पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मच्छिमारांनी घेतली नाईक यांची भेट अनधिकृत पर्ससीनप्रश्नी वेंगुर्लेतील मच्छिमारांनी मालवण दौऱ्यावर असलेल्या आमदार वैभव नाईक यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. वेंगुर्लेच्या किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांच्या क्षेत्रात अनधिकृत पर्ससीन नौकांकडून मासेमारी केली जात आहे. याबाबत मत्स्य विभागाकडून कारवाई करून मच्छिमारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी आमदारांकडे करण्यात आली. यावेळी शिवसेना नेहमीच पारंपरिक मच्छिमारांच्या पाठीशी राहिली आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार व पालकमंत्री यांच्यासह मुख्यमंत्रीही पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने आहेत. म्हणूनच पर्ससीनवर निर्बंध घालण्यात आले. यापुढे अनधिकृत व बेकायदेशीर पर्ससीनवर कारवाई केली जाईल, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.
‘पर्ससीन’कडून सागरी क्षेत्रात घुसखोरी
By admin | Published: September 30, 2016 12:49 AM