वेंगुर्ला : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू पिकावर पानगळ तसेच पाने-फांद्या वाळण्याची समस्या निर्माण झाली आहे. गत काही वर्षापासून अशाप्रकारची समस्या तुरळक स्वरुपात आढळून येत होती, परंतु यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. यावर प्रतिबंधक म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतर्फे उपाययोजना सूचविल्या आहेत.संपूर्ण जुलै महिना आणि आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण जवळपास १०० टक्के एवढे राहिले. सततच्या पावसामुळे काजू पिकाच्या फांद्या आणि पाने दीर्घकाळ ओली राहिली. हे सर्व घटक फायटोप्थोरा रोगकारक बुरशीच्या वाढीसाठी आणि प्रचारासाठी कारणीभूत ठरले आहेत. विद्यापीठाच्या वाकवली येथील प्रक्षेत्रावर केलेल्या सर्वेक्षणात या रोगाचा प्रादुर्भाव वेंगुर्ला-४ या जातीवरच जास्त प्रमाणात आढळून आला. वेंगुर्ला-१,३,५,७ या जातीवर या रोगाचा प्रादुर्भाव नगण्य स्वरुपाचा होता.रोगग्रस्त बागेतील रोगामुळे गळून पडलेली पाने जमवून बागेपासून दूर अंतरावर खोल खड्ड्या गाडून टाकावीत. रोगाने बाधीत झालेल्या फांद्या कापून काढाव्यात. रोगाचा प्रादुर्भाव फांदीच्या किती अंतरापर्यंत पसरला आहे याचा विचार करुन फांदी कापताना संपूर्ण रोगग्रस्त वाळलेला भाग आणि त्यामुळे सुमारे १० सेंटीमीटर जिवंत भाग असेल अशा ठिकाणी फांदी गोलाकार पद्धतीने कापावी. जिवंत फांदीच्या कापलेल्या भागावर त्वरित बोडोर्पेस्टचा लेप द्यावा. रोगग्रस्त फांद्या बागेपासून दूर अंतरावर जमा करुन नष्ट कराव्यात. अशाप्रकारे बागेची आणि झाडाची स्वच्छता केल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी द्यावी.फवारणीसाठी मेटॉलेक्झील ८ टक्के आणि मॅन्कोझेब ६४ टक्के हे घटक असणारे संयुक्त बुरशीनाशक परिणामकारक असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. हे बुरशीनाशक १० लिटर पाण्यात २० ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. फवारणी पावसाची उघडीप बघून करावी. पुढील वर्षी पावसाला सुरुवात झाल्यानंतर ८ ते १५ दिवसानंतर पावसाची उघडीप बघून १ टक्के बोर्डो मिश्रणाची प्रतिबंधात्मक फवारणी करावी, असे आवाहन कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.उत्पादन क्षमतेत घट होण्याची शक्यतारोगग्रस्त झाडांवरील पाने सुरुवातीस पिवळी पडतात. त्यानंतर त्यांचे देठ, मध्यशिर आणि उपशिर तपकिरी होतात आणि अशी पाने पुढील ४ ते ५ दिवसात पूर्णपणे वाळून जातात. रोगग्रस्त पानांवरील प्रादुर्भावानंतर फांदीच्या टोकावरील असलेल्या कोंबावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन कोंब कुजतो. तसेच त्याखालील फांदीच्या तुलनेने कोवळा असलेला भाग काळा पडून त्यावर सुरकुत्या पडतात आणि फांदी शेंड्याकडून मागे वाळत जाते. पूर्ण प्रादुर्भाव झालेली झाडे निष्पर्ण होऊन झाडावरील शेंड्याच्या फांद्या, उपफांद्या, मुख्यफांद्या क्रमाक्रमाने वाळतात. झाडांची उत्पादन क्षमता घटल्याने पुढील वर्षीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट संभवते.
काजूपिकावर पानगळीचा प्रादुर्भाव, दापोली कृषी विद्यापीठाने सूचविल्या उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 1:49 PM
आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू पिकावर पानगळ तसेच पाने-फांद्या वाळण्याची समस्या निर्माण झाली आहे. गत काही वर्षापासून अशाप्रकारची समस्या तुरळक स्वरुपात आढळून येत होती, परंतु यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. यावर प्रतिबंधक म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीतर्फे उपाययोजना सूचविल्या आहेत.
ठळक मुद्देकाजूपिकावर पानगळीचा प्रादुर्भाव, कोकणातील समस्या दापोली कृषी विद्यापीठाने सूचविल्या उपाययोजना