कणकवली : चौपदरीकरणात संपादन होणाऱ्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी महसूल विभागातर्फे संबंधित गावांमधील जमिन व्यवहारांची माहिती मागवण्यात येत आहे. महामार्गालगतच्या झाडांची मोजणी सुरू आहे. चौपदरीकरणाची सिंधुदुर्गातील जमिन मोजणी पूर्ण झाली आहे. आता यापुढे घरे, झाडे आदींची मोजणी आणि मूल्यांकन केले जाणार आहे. झाडांची मोजणी सुरू करण्यात आली असून झाडाची जात, घेर, उंची आदी ठराविक माहिती मिळाल्यानंतर आपोआप त्याचे मूल्यांकन महसूल विभागात संगणकाद्वारे तयार होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घरांचे मूल्यांकन तर वनविभागाकडून झाडांची मोजणी केली जाणार आहे. संपादन केल्या जाणाऱ्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी नोटिफिकेशन जाहीर होण्यापूर्वीचे ५० जमिन व्यवहार विचारात घेतले जातील. त्या व्यवहारांची सरासरी काढून बाजारभाव ठरविला जाणार आहे. नोटिफिकेशन जुलै, आॅगस्टमध्ये भूसंपादनाविषयी ‘३ कॅपिटल ए’ची नोटीस जुलै, आॅगस्ट महिन्यात काढली जाणार आहे. या नोटीसीपूर्वीचे जमिन व्यवहार बाजारभाव ठरवण्यासाठी विचारात घेतले जातील. चौपदरीकरणाची जमिन मोजणी पूर्ण झाली असली तरी अद्याप झाडे आणि घरे आदींचे मूल्यांकन होणे बाकी आहे. झाडांची मोजणी सुरू झाली असून जमिन मोजणी झालेल्या ईटीएस मशिनद्वारेच ही मोजणी केली जात आहे. जमिन मोजणीपेक्षा झाडांची मोजणी करण्यासाठी जास्त वेळ लागत आहे. जुन्या रस्त्याच्या जागा परत नाही जिल्ह्यातील नागमोडी वळणाचा महामार्ग आहे. वळणे काढण्यासाठी काही ठिकाणी नव्या जागेतूनच मार्ग नेला जाणार आहे. त्यासाठीही जमिन मोजणी पूर्ण झाली आहे. नव्या जागेतून मार्ग जात असला तरी जुन्या संपादित जमिनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परत केल्या जाणार नाहीत. (प्रतिनिधी)
जमीन व्यवहारांची माहिती मागवली
By admin | Published: June 16, 2015 12:54 AM