सावंतवाडी : येथील पालिकेच्यावतीने २५ ते ३१ डिसेंबर रोजी आयोजित केलेला सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१८ जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने जेष्ठ गायक सुदेश भोसले, पंडित जयतीर्थ मेवुंडी, सारेगम फेम विजेता रॉकस्टार जसराज जोशी, कॉमेडी बुलेट फेम किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांचे बहारदार कार्यक्रम पार पडणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगराध्यक्ष बबन साळगावकर
महोत्सवाचे उद्घाटन पालकमंंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यावेळी सांगितले.नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पर्यटन महोत्सवाची रूपरेषा जाहीर केली. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, क्रीडा व आरोग्य सभापती आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेविका योगिता मिशाळ, कीर्ती बोंद्रे, साक्षी कुडतरकर आदी उपस्थित होते.यावेळी साळगावकर म्हणाले, २७ रोजी मोती तलावात तरंगता शोभायात्रेने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. यावेळी तेजोमय सांस्कृतिक कलामंचचे ढोलपथक संचलन व शस्त्रप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता खाद्य जत्रा व विविध वस्तूंचे प्रदर्शव व विक्री स्टॉलचे उद्घाटन, ७ वाजता मान्यवरांचे स्वागत व सत्कार होणार आहेत.
७.३० वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीची नृत्यांगना स्मृतिरेखा दास यांचा विविध सांस्कृतिक कार्यक्रम व ओडिसी नृत्य होणार आहे. खास महिलांसाठी दररोज सायंकाळी होणाऱ्या शिवउद्यान अँकर टी.व्ही. फेम तुषार सावंत यांच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.रात्री ८.३० वाजता नाद सुरमयी हा भावगीत, भक्तीगीत, लावणी, गोंधळ, जुनी-नवी मराठी चित्रपट गीतांनी सजलेला कार्यक्रम होणार आहे. २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीची नृत्यांगना स्मृतिरेखा दास यांचे ओडिसा नृत्य, रात्री ८.०० वाजता साक्षात्कार प्रॉडक्शन प्रस्तुत मालवणी सुरांच्या गजाली, ८.३० वाजता ऋतिक फाऊंडेशन प्रस्तुत संगीत रजनी पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचा शास्त्रीय-उपशास्त्रीय, नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता स्थानिक विजेत्यांचे कार्यक्रम, रात्री ८.०० वाजता मेलडी मेकर्स सुदेश भोसले व सहकलाकार यांचा भरगच्च संगीत-गायनाचा कार्यक्रम होणार आहे. ३० डिसेंबरला ६.३० वाजता स्थानिक विजेत्यांचे कार्यक्रम, ७.३० वाजता आदिस क्रिएशन प्रस्तुत सारेगम विजेता रॉकस्टार जसराज जोशी, व्हॉईस आॅफ इंडिया फेम रचित अग्रवाल, हास्यसम्राट विजेता के. अजेश, कॉमेडी बुलेटट्रेन फेम किरण तांबे, दत्ता भेंद्रे, गोवा आयडल अक्षय नाईक, कोकणची महागायिका विजेता नेहा आजगावकर यांचा सदाबहार असा रंगारंग कार्यक्रम सादर केला जाणार आहे.महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक विजेत्यांचे कार्यक्रम, ७.०० वाजता समारोप समारंभ, ८.०० वाजता आई प्रस्तुत सिध्देश मालंडकर निर्मित जल्लोष २०१७ हा रंगारंगी मनोरंजन व महाराष्ट्राची लोककलांचा कार्यक्रम होणार आहे. सावंतवाडीकरांनी महोत्सवाचा भरपूर आनंद लुटावा, असे आवाहन योवेळी साळगावकर यांनी केले.सावंतवाडीत १७ ठिकाणी वायफाय सुविधासावंतवाडी पालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अॅपचा वापर नागरिकांनी करावा. त्याचबरोबर नागरिकांच्या मनोरंजनासाठी शहरातील प्रमुख सतरा ठिकाणी मोफत वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
या वायफाय सेवेचा कोणाकडूनही गैरवापर झाल्यास सुविधा बंद करण्यात येणार असून, सावंतवाडी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनी पालिकेच्या वायफायचा जास्तीत वापर करावा, असे आवाहन बबन साळगावकर यांनी यावेळी केले.
महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रममहोत्सवाच्या दररोज सायंकाळी ६.३० वाजता एक तास शिवउद्यान अँकर टीव्ही फेम तुषार सावंत यांचा खेळ पैठणीचा हा चालता-बोलता प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिलांना दररोज खास बक्षिसे ठेवण्यात आली असून, शेवटच्या दिवशी पैठणी बक्षीस ठेवण्यात आल्याचे साळगावकर म्हणाले.