रत्नागिरी : सर्वच क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही याचा वापर अत्यल्प होत आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातील विशिष्ट सामाजिक गरजांवर लक्ष केंद्रित करून, त्यासाठी आवश्यक अशी माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘विकास पेडिया’ या भारत सरकारच्या वेब पोर्टलविषयी माहिती देण्यासाठी, आज रत्नागिरीत विविध संस्थांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या बहुभाषिक वेबपोर्टलच्या मराठी भाषेतील विभागासाठी पुण्यातील ‘वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट’ या राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्थेची निवड केली आहे. ही संस्था पाणलोट क्षेत्र विकास आणि हवामानातील बदल अनुकुल कार्यक्रम, या क्षेत्रात काम करत आहे. ‘५्र‘ं२स्री्िरं.्रल्ल’ या बहुभाषिक पोर्टलवरून मराठी भाषेतून सहा प्रमुख क्षेत्रांंमधील माहितीची देवाणघेवाण करणे, यासाठी स्वयंसेवक तयार करणे, हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. ‘वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट’ आणि येथील समाजभान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे शहरातील सिद्धी विनायक मंगल कार्यालयात आयोजन केले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाजभानचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये होते. यावेळी व्यासपीठावर हैद्राबाद येथील सीडॅक संस्थेचे राकेशकुमार, तसेच वॉटरशेड आॅर्गनायझेशनच्या निलीमा जोरवर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या वेब पोर्टलवर शासनाच्या योजनांबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील इतरही विकासात्मक बाबी जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.नीलिमा जोरवर यांनी प्रस्तावनेत ‘वॉटर’ संस्थेचे कार्य व उद्देश याच्याबद्दल माहिती दिली. अभिजीत हेगशेट्ये यांनी या पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विकासात्मक बाबी सर्वदूर पोहोचतील, तसेच इतर विषयांची माहिती जिल्ह्याला उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. सीडॅक संस्थेचे राकेशकुमार यांनी सीडॅक संस्थेचे कार्य विषद केले. यानंतर कार्यशाळेला प्रारंभ झाला.पहिल्या टप्प्यात नीलिमा जोरवर यांनी ‘विकास पेडिया’ माहितीचे सादरीकरण केले. गट कार्य आणि सादरीकरण करताना कृषी, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ई- प्रशासन, ऊर्जा यावर आधारित सहा गट स्थापन करून, त्यांच्याकडून संबंधित विषयाचे सादरीकरण करून घेतले. यानंतर, उपस्थितांकडून प्रतिक्रिया घेण्यात आले. सूत्रसंचालन यशश्री पुरोहित यांनी केले. आभार युयुत्सु आर्ते यांनी मानले.या कार्यशाळेसाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
‘विकास पेडिया’तून माहितीची देवाणघेवाण
By admin | Published: February 03, 2015 11:36 PM