दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी येथे भर लोकवस्तीत असलेल्या साई प्लाझा रेसिडन्सीमधील बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचा मिळून एक लाख ५८ हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल लुटल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. चोरट्यांचा माग घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, श्वान बसस्थानकापर्यंत जाऊन घुटमळले. याबाबत दोडामार्ग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साई प्लाझा या बिल्डिंगच्या प्लॅट क्र. ४ मध्ये स्नेहा सीताराम वरक (वय ४५, मूळ रा. पळसंब, ता. मालवण) या वृद्ध सासुबाई सरस्वती धाकू वरक (७५) यांच्यासोबत राहतात. स्नेहा वरक यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाल्याने घरात कर्ता पुरुष नसल्याने त्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मासे विक्री व फुल विक्रीचा व्यवसाय करतात. दोन दिवसांपूर्वी शिरगाव, गोवा येथील लईराई देवाचा जत्रोत्सव होता. तेथे त्या फुल विक्रीसाठी गेल्या होत्या. तर सासुबाई पळसंब (ता. मालवण ) येथे आपल्या मूळ गावी १५ दिवसांपूर्वीच गेल्या होत्या. प्लॅटमध्ये कोणी नसल्याने अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहायाने प्लॅटचा दरवाजा उघडून कपाटातील सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली. गुरुवारी सायंकाळी स्नेहा वरक यांच्या शेजारीच राहणारे अनिरुद्ध नंदकिशोर चांदेलकर यांना वरक यांचा प्लॅट उघडा असल्याचे दिसले. त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून वरक यांना कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी शिरगावहून येऊन पाहिले असता घरात कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. तसेच लोखंडी पत्र्याच्या कपाटातील रोख रक्कम ५000 रुपये व दागिने नसल्याचे निदर्शनास आले. वरक यांनी कपाटात १८00 रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगडया (१४मि. ग्रॅ.), ५0 हजार रुपये किमतीची २.५0 मि.ली. गॅ्रम वजनाची तोळ्याची सोन्याची माळ, ८000 रुपये किमतीची ४ मि.ली. ग्रॅम वजनाची जुनी अंगठी, १६000 रुपये किमतीची ८ मि.ली. ग्रॅम वजनाच्या कानातील दोन कुड्या, २000 रुपये कि मतीची १ मि.ली.ग्रॅम वजनाची नाकातील नथ, ८00 रुपये किमतीचा कंबरेचा चांदीचा धातूचा छल्ला, असा एकूण एक लाख ५८ हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)श्वान पथकास पाचारणचोरीची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. तसेच ठसे तज्ज्ञांनाही बोलविण्यात आले. घटनास्थळी एका पुरुषाचे तुटलेले चप्पल आढळले. त्याचा वास श्वानाला देताच ते बिल्डिंगच्या समोरच असलेल्या बसस्थानकात येऊन घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्यात अपयश आले.बनावट चाव्यांचा उपयोग?साई प्लाझामधील फ्लॅटमध्ये चोरी करताना चोरांनी बनावट चाव्यांचा उपयोग केल्याचे उघड झाले आहे. दरवाजाची कडी न तोडता किंवा कुलूप न तोडता बनावट चाव्यांच्या सहायाने दरवाजा उघडण्यात आला. तसेच फ्लॅटमधील कपाटही बनावट चावीनेच उघडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
सुरुचीवाडीत बंद फ्लॅट फोडला
By admin | Published: May 14, 2016 12:22 AM