मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना गेली नऊ वर्षे राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करीत असल्यामुळे चिवला बीच पर्यटनदृष्ट्या नावारुपाला आले आहे. राज्यासह देशातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असल्याने पर्यटन व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल होते. मात्र, यावर्षी दोन स्पर्धकांना जीव गमवावा लागल्यानंतर त्या दुर्घटनेचा बाऊ केला गेला.
भविष्यात स्पर्धेसाठीच्या त्रुटी दूर करण्यासाठी आयोजकांना सहकार्य करून योग्य नियोजन करण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार तसेच सामाजिक संस्था पुढाकार घेतील, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक बाबा परब यांनी दिली.मालवण येथील हॉटेल सिल्वर सॅन्ड येथे पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार तसेच नागरिकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या पुढील वर्षी होणाऱ्या दहाव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेला सर्वांनी पूर्ण पाठींबा देताना आयोजकांच्या पाठीशी असल्याची भूमिका मांडली. यावेळी मंदार केणी, यतीन खोत, डॉ. राहुल पंतवालावलकर, भाई कासवकर, रूजाय फर्नांडिस, संतोष परब, फ्रान्सिस फर्नांडिस, अमू हर्डीकर, पावलू सोज, शरद जोशी, रोहित मेतर आदी उपस्थित होते.चिवला बीच येथे स्पर्धा घेणारे आयोजक हे मालवणचेच आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. जलतरण स्पर्धेमुळे भारतात चिवला बीच नावारुपाला आले आहे. हॉटेल व्यावसायिक, किल्ले दर्शन, जलक्रीडा तसेच मालवणी मेवा, मासळी खरेदी आदी व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल हंगाम नसताना होते. यावर्षी दोन स्पर्धकांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने आयोजकांवर टीका करून स्पर्धा बंद होण्याची मागणी केली जात होती.मात्र, चिवला बीच येथे जलतरण स्पर्धा व्हायलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे बाबा परब यांनी सांगितले.आयोजकांकडून स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. काही त्रुटी असल्यामुळे दोघा स्पर्धकांचा मृत्यू झाला. मात्र याच स्पर्धेत चार अंध व अनेक अपंग मुलांनी स्पर्धा यशस्वीपणे पार केली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी स्थानिकांच्या पुढाकारातून स्पर्धा व वाहतूक नियोजन केले जाईल.
स्पर्धेची व्यापकता पाहता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आयोजकांना सहकार्य करण्यात येईल, असे यतीन खोत यांनी सांगितले. आम्ही स्थानिक ग्रामस्थ स्पर्धा आयोजकांसोबत असून भविष्यातील स्पर्धेच्या नियोजनात सहभागी होऊन यावेळी झालेल्या चुकांची दुरूस्ती केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
विमा उतरविण्याबाबतही होणार विचारयावेळी मंदार केणी यांनी दुर्घटनेचा बाऊ करून राजकारण केले गेले. मात्र आता चिवला बीच येथील नागरिक स्पर्धा होण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे संघटनेला कोणी बदनाम करू नये. पुढील वर्षी याचठिकाणी नियोजनबद्ध स्पर्धा होईल, असे त्यांनी सांगितले. तर डॉ. वालावलकर यांनी स्पर्धेदरम्यान सहभागी स्पर्धकांचा अपघाती विमा उतरविण्याबाबतही विचार केला जाईल असे सांगितले.
आयोजक स्पर्धेदरम्यान कोणतेही राजकारण करीत नाहीत. उलट सर्व राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकाºयांना सन्मान देतात. त्यामुळे काही व्यक्तींकडून आयोजकांवर आकसाने होणारी टीका चुकीची आहे, असेही व्यावसायिकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हावी!सागरी जलतरण क्रीडा प्रकाराला आॅलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळाले आहे. मालवणातून यशस्वी झालेले स्पर्धक भविष्यात भारतासाठी आॅलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करू शकणार आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या दहाव्या वर्षी स्पर्धेची व्यापकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धा होण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जलतरण संघटनेकडे मागणी करण्यात येणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.