मालवण : सागरी अतिक्रमणग्रस्त देवबाग बंधाऱ्याच्या कामासाठी ८९ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या निधीची गरज असल्याने त्या संदर्भातील परिपूर्ण प्रस्ताव तयार करा, तसेच संरक्षक बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करा, अशी सूचना करतानाच तोंडवळी-तळाशील येथील अपूर्ण बंधाऱ्याच्या चौकशीचे आदेशही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. उद्योगमंत्री राणे यांनी आज मालवण तालुक्यातील सागरी अतिक्रमणग्रस्त तोंडवळी-तळाशील व देवबाग किनारपट्टीची पाहणी केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, तहसीलदार वनिता पाटील, तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, श्रावणी नाईक, संजीवनी लुडबे, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी यांच्यासह पत्तन व बंदर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राणे म्हणाले, यापूर्वी देवबाग, तळाशील व तोंडवळी किनारपट्टीवर सागरी अतिक्रमणामुळे संकट निर्माण झाले होते. या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता. केवळ आश्वासने न देता बंधारा पूर्ण केला. यापुढेही बंधाऱ्याची कामे स्वत: करणार आहोत. (प्रतिनिधी)राऊतांचा ‘सी वर्ल्ड’शी संबंध काय?सी-वर्ल्डप्रश्नी खासदार विनायक राऊत चतुर्थीवेळी ग्रामस्थांची बैठक घेणार आहेत. याबाबत राणे म्हणाले, खासदार राऊतांचा सी- वर्ल्ड प्रकल्पाशी संबंध काय? मुळात राज्य शासनाने जाहीर केलेले प्रकल्प व योजना बंद करण्याचे अधिकार खासदारांना कोणी दिले? यामुळे जाहीर केलेले प्रकल्प हे होणारच. जनतेच्या काही तक्रारी असतील तर त्या विचारात घेतल्या जातील, असेही राणे म्हणाले. संरक्षक बंधारे उभारण्यासाठी लागणारा निधी राज्य शासनाकडून मंजूर होतो. असे असताना शिवसेनेचे खासदार बंधाऱ्याचे काम केंद्र शासनाच्या निधीतून करण्याचे आश्वासन देत सुटले आहेत. खासदारांनी आपले अज्ञान उघड करून फसवाफसवीची कामे करू नयेत, असा टोलाही राणे यांनी लगावला.
मालवण -तळाशील बंधाऱ्याची चौकशी करा
By admin | Published: August 25, 2014 11:28 PM