रहिम दलाल - रत्नागिरी --शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या १६० बंधाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत बंधाऱ्यांची चौकशी करुन अहवाल सादर करावा, असा आदेश नूतन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या चौकशीत तरी बंधाऱ्यांमधील निकृष्टपणा बाहेर पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. समुद्राचे पाणी शेतात घुसून जमिनी नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी शासनाने बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शासनाच्या पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सिमेंट नाला बांध, सलग समतल चर, वळण बंधारा, अनगड दगडी बांध आदी बंधाऱ्यांची कामे झाली होती. जिल्ह्यात सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात सिमेंटचे १६० बंधारे बांधण्यात आले होते. बंधाऱ्यांच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. या बंधाऱ्यांची कामे स्थानिक स्तरावर करण्यात येत होती. मात्र, ज्या ठिकाणी सिमेेंट बंधारे बांधण्यात आले आहेत, ती कामे निकृष्ट दर्जाची असल्याची ओरड सुरु होती. बंधारे बांधल्यानंतर पाणी आत शिरत असल्याने अनेक ठिकाणचे बंधारे निकृष्ट असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केला होता. जिल्हा परिषद जलसंधारण समिती आणि स्थायी समितीच्या सभेत हे बंधारे प्रकरण जोरदार गाजले होते. त्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाकडून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करण्याचा ठराव मंजूर केला होता. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या सचिवपदी जिल्हा परिषद कृषी अधिकारी पी. एन. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच तालुकास्तरावर चौकशी समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. पालकमंत्री वायकर जिल्हा दौऱ्यावर आले असताना बंधारे प्रकरण जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. त्यामध्ये विशेष लक्ष घालून त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना बरोबर घेऊन बंधाऱ्यांचा पाहणी दौरा करायचा आहे.निकृष्ट दर्जाच्या सिमेंट बंधाऱ्यांची चौकशी करुन येत्या १५ दिवसांत अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. जमीन नापीक होण्याची भीतीपाणलोटच्या बंधाऱ्यांची अवस्था अशा प्रकारे वाईट असल्याने हजारो हेक्टर जमीन नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांबाबत वेळीच निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.तालुकासिमेंटचे बंधारेगुहागर९चिपळूण५संगमेश्वर२०रत्नागिरी३०राजापूर९०एकूण१६०
पाणलोटच्या १६० बंधाऱ्यांची चौकशी
By admin | Published: February 02, 2015 10:47 PM