मालवण : स्वयंपाक बनवित असताना स्टोव्हचा भडका उडून मच्छिमारी ट्रॉलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची दुर्घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी माजी खासदार नीलेश राणे यांनी मालवणला भेट देत या जळीतग्रस्त ट्रॉलरची पाहणी केली. या दुर्घटनेमुळे संबंधित ट्रॉलर मालकांवर आपत्ती कोसळली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांना पुन्हा एकदा सावरण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही राणे यांनी दिली.राजकोट मच्छिमार सहकारी सोसायटीच्या सहकार्याने राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेंतर्गत हा ट्रॉलर खरेदी करण्यात आला होता. जेम्स रेमेत ब्रिटो उर्फ जॉमी हे हा ट्रॉलर चालवत होते. शनिवारी सकाळी राजकोट समुद्रकिनारी उभ्या असलेल्या ‘सोमिया’ या ट्रॉलरमधील स्टोव्हचा भडका उडून हा ट्रॉलर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी खासदार नीलेश राणे यांनी रविवारी राजकोट येथे येत दुर्घटनाग्रस्त ट्रॉलरची पाहणी केली. तसेच ब्रिटो यांच्याशी संवाद साधला.यावेळी ब्रिटो यांना या दुर्घटनेतून सावरण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही राणे यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा परब, दीपक पाटकर, मनमोहन वराडकर, आबा हडकर, सहदेव बापर्डेकर, बाळा भाबल, लुईस रॉड्रीक्स, अभय कदम, राजू बिडये, बबन रेडकर, जॉन नऱ्होना यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जळीतग्रस्त मच्छिमार ट्रॉलरची पाहणी
By admin | Published: April 12, 2016 9:50 PM