गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : महामार्गावर ठिकठिकाणी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. तसेच प्रवाशांकडून चढ्या दराने तिकीट आकारणी केली जाते आहे का, हे पाहण्यासाठी दोन दिवस मोहीम आखण्यात आली. आरटीओ अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली ५५ गाड्यांची तपासणी करण्यात आली.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यामार्फत ३० व ३१ मे रोजी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम राबविण्यात आली तसेच नेमून दिलेल्या तिकीट दरापेक्षा जास्त दराने तिकीट आकारणी केले आहे का, याबाबत तपासणी करण्यात आली. ही तपासणी महामार्गावरील ओरोस, कासार्डे, ओसरगाव टोल नाका येथे करण्यात आली. यावेळी एकूण ५५ हून अधिक वाहनचालकांची तपासणी केली. यात कोणीही दारू पिऊन वाहन चालवत नसल्याचे आढळून आले. तर तिकीट सुद्धा चढ्या दराने विक्री होत नसल्याचे या पाहणीत आढळून आले. या मोहिमेत आरटीओ निरीक्षक विनोद भोपाळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक केतन पाटील, अमित पाटील व वाहनचालक एस.व्ही. स्वामी उपस्थित होते.महामार्ग सुरळीत झाला खरा, परंतु अपघातांची संख्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. दररोज अपघात होत आहेत. कित्येक जणांचे जीव जात आहेत. वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. याला रोधक लावण्यासाठी आरटीओ विभाग प्रयत्नशील आहे. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, योजना, मोहिमा राबविल्या जात आहेत.
सिंधुदुर्गात महामार्गावर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहन चालकांची तपासणी
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 31, 2024 6:38 PM