देवगड (सिंधुदुर्ग) : किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून पुरातत्व विभागाच्यावतीने या किल्ल्याच्या डागडुजीसाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने सहकार्य करावे अशी अपेक्षा भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्रीय अतिरिक्त महासंचालक जान्हवीज शर्मा यांनी विजयदुर्ग येथे व्यक्त केली.शर्मा यांनी शनिवारी विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन संपूर्ण किल्ल्याची पाहणी केली. तत्पूर्वी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, संचालक प्रदीप साखरकर, गणेश मिठबावकर तसेच माजी उपसरपंच महेश बिडये, गणेश पुजारे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रेरणोत्सव समितीच्या सदस्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी अशा प्रकारची समिती शासनाच्या कामात नेहमीच गरजेची असते. ही तत्परता विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने दाखवली असून वेळोवेळी आपलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यासाठी आपण लक्ष देऊन पाठपुरावा करावा, जेणेकरून राज्य शासनाचा निधी विजयदुर्ग किल्ल्याला मिळेल असं सांगितलं. यावेळी महासंचालक जान्हवीज शर्मा यांच्या सोबत भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई सर्व्हेक्षण कार्यालयाचे अधिक्षक शुभ मुजुमदार, विजयदुर्ग उपविभागाचे अधीक्षक राजन दिवेकर तसेच दिल्ली येथील पुरातत्व विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना बुरूजाचे अंदाजपत्रक देण्यासाठी पत्र
दरम्यान, किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या दर्या बुरुजासंदर्भात भाष्य करताना राज्य शासनाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुरातत्व विभागाच्या मुंबई कार्यालयात बुरुजाचे अंदाजपत्रक देण्यासाठी पत्र देण्यात आल्याचे सांगितले.