कणकवली : एखाद्या कलेचा प्रसार म्हणजे माणसातल्या माणूसपणाचा त्याच्या चांगुलपणाचा प्रसार करण्यासारखे आहे. गंधर्व फाऊंडेशन सारख्या ज्या संस्था संगीत क्षेत्रात कार्य करतात त्यांच्याबद्दल मला खरोखर आदर वाटतो. त्यांचे हे कार्य दखलपात्र असे असून त्यांचा आदर्श सर्वानी घेणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व शास्त्रीय संगीत सभेच्या द्वितीय वर्ष पूर्ती निमित्त कणकवली येथील गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.दिलीप पांढरपट्टे पुढे म्हणाले, गंधर्व संगीत सभेसारख्या उपक्रमांना पाठबळ देणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहिलो आहे. या उपक्रमाला लाभलेला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद हा वाखाण्याजोगा आहे. संगीताच्या ओढीने जमलेल्या गर्दी आणि दर्दीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वास्तविक पहाता कलेचा आनंद घेणे महत्वाचे असते. कला ही आनंद देण्यासाठी असते. जो कलाकार आहे किंवा जो रसिक आहे, तो माणूस दुष्ट, क्रूर , वाईट असूच शकत नाही. असेही पांढरपट्टे यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात प्रसाद घाणेकर यांनी ओघवत्या शैलीत प्रास्ताविक केल्यानंतर ,गंधर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. तसेच या उपक्रमातून कानसेन रसिक तयार होतीलच ,परंतु त्याही पुढे इथे उपस्थित अनेक नव्या कलावंतांना कलासाधनेची प्रेरणा या उपक्रमातुन मिळेल आणि त्यातूनच भविष्यातील कलाकार घडतील असा आशावाद व्यक्त केला.यानंतर शास्त्रोक्त संगीतात, संवादिनी वादन आणि संवादिनीचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या आणि स्वतःची कला जोपासत इतर अनेक नव्या कलावंतांना ऊर्जा देणाऱ्या आदित्य ओक यांना युवा गंधर्व सन्मान जिल्हाधिकारी तथा सुप्रसिद्ध गजलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. शाल श्रीफळ, पाच हजार रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असे या सन्मानाचे स्वरूप होते .दिलीप पांढरपट्टे यांचाही विलास खानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. २४ वी गंधर्व संगीत सभा व युवा गंधर्व सन्मानाचे प्रायोजक प्रतिथयश लेखापाल दामोदर खानोलकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे व कलाकारांचे स्वागत केले व आभार मानले .यानंतर प्रसाद घाणेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत आदित्य ओक यांनी लक्षवेधी विधाने केली. कलावंताने आजच्या युगात तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे. कारण ती जगाची भाषा आहे. कला आणि तंत्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे सांगत गंधर्व सभेच्या वेळ पाळण्याचे विशेष कौतुक करत, अनेक गमतीजमती सांगत, मुलाखतीला रंगत आणली .
'ज्याचे दफ्तर आणि मन व हृदय साफ आहे, अशा सृजनशील कलावंत आणि अधिकाऱ्याच्या हस्ते झालेला हा सत्कार माझ्या कायम मनात राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यानंतर झालेल्या आदित्य ओक यांच्या संवादिनी वादनात प्रथम त्यांनी शुद्ध मध्यमाचा मारवा सादर करीत ,पुढे एकामागे एक अशी नाट्यपदे व अभंग सादर केले व भैरवीने सांगता केली .दत्तक्षेत्र आशिये मठ येथील सभागृहात रंगलेली हि मैफल यशस्वी होण्यासाठी किशोर सोगम ,संतोष सुतार ,गिरीश सावंत, शाम सावंत, अभय खडपकर, राजू करंबेळकर, मनोज मेस्त्री ,बाबू गुरव, सागर महाडिक, मिलिंद करंबेळकर, विनोद दळवी, सुनील आजगावकर यांनी विशेष प्रयत्न केले .पुढील गंधर्व सभा 30 डिसेंबर रोजी!आशिये येथे ३० डिसेंबर रोजी मासिक गंधर्व संगीत सभे अंतर्गत जगत् विख्यात तबला वादक पं.रामदास पळसुले यांचे तबला वादन होणार आहे. असे यावेळी जाहिर करण्यात आले.