देवगड : बुद्धिबळ खेळांमुळे शारीरिक विकासाबरोबर मनाची एकाग्रता व निर्णय क्षमता वाढून बौद्धिक विकास होतो. याचा शालेय अभ्यासासाठी उपयोग करता येतो म्हणूनच आजच्या संगणक व मोबाईल युगात खेळाचे महत्त्व वाढत आहे, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांनी केले. जामसंडे येथील श्री. मो. गोगटे माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक भवनामध्ये १४, १७ व १९ वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक क्रीडा अधिकारी नदाफ यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तानवडे, स्वागत हिरवे व आभार जमदाडे यांनी मानले. विजेत्या स्पर्धकांची निवड कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. पंच म्हणून हिराचंद तानवडे, विजयकुमार हिरवे, श्री. संतोष गुडेकर, अभिजित सांगळे, अमोल जमदाडे आणि राजदीप सावंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
बुद्धिबळ खेळामुळे बौद्धिक विकास
By admin | Published: August 31, 2015 9:05 PM