नांदगाव : संवाद महत्त्वाचा असून संवादाने विकास होऊ शकतो आणि त्यासाठीच या वास्तूचा योग्य विनिमय झाला पाहिजे. या वास्तूच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या दर्जाचे काम करणार आहात ते महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले. तळेरे ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी तळेरे ग्रामपंचायतीच्या नूतन वास्तूचे आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, माजी सभापती सोनाली शिर्सेकर, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र ऊर्फ बाळा जठार, सरपंच दर्शना बांदिवडेकर, उपसरपंच शशांक तळेकर, ग्रामसेवक वाय. एस. बोराडे, माजी उपसभापती संतोष कानडे, माजी सरपंच दिलीप तळेकर, काँग्रेसचे तळेरे विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, सूर्यकांत तळेकर, श्रावणशेठ बांदिवडेकर, गोपाळशेठ बांदिवडेकर, माजी सरपंच विनय पावसकर, सुरेश तळेकर, हनुमंत तळेकर, पोलिस पाटील चंद्रकांत चव्हाण, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ओझरम सरपंच प्रतिभा राणे, कासार्डे सरपंच संतोष पारकर, वारगाव उपसरपंच एकनाथ कोकाटे, कासार्डे ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ऋतुराज कदम, व्यापारी संघटना अध्यक्ष दत्तात्रय कल्याणकर, बापू डंबे, मोहन भोगले, मनोज महाडिक, दीपक नांदलस्कर, चंद्रकांत तळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले की, सध्या केंद्र सरकारने राबविलेल्या धोरणानुसार थेट ग्रामपंचायतीमध्ये निधी मिळणार असून यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी योग्य नियोजन करून या निधीचा उपयोग गावासाठी योग्यप्रकारे केला पाहिजे. त्याचवेळी या इमारतीचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. खरा विकास करायचा असल्यास पायाभूत सुविधा व शेवटच्या घटकाचा विकास होणे गरजेचे आहे. विकासाचे प्रकल्प गावात कसे येतील हे पाहिले पाहिजे. ज्या इमारतीचे उद्घाटन करतो आहे त्या इमारतीतून चांगले काम होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीचा जसा इतिहास महत्त्वाचा आहे, तसेच भविष्यही महत्त्वाचे आहे. कोणती विकासाची कामे नजरेसमोर ठेवून या इमारतीचा वापर करणार आहोत हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. यावेळी सतीश सावंत म्हणाले की, ग्रामपंचायत हे गावाचे मंत्रालय असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या निधीचा वापर योग्यप्रकारे होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, सरपंच दर्शना बांदिवडेकर, सूर्यकांत तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या ग्रामपंचायतीच्या नूतनीकरणासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या माजी सरपंच दिलीप तळेकर यांचा आमदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच शशांक तळेकर यांनी करून सूत्रसंचालन विनय पावसकर यांनी केले. आभार प्रवीण वरुणकर यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
संवादाने विकास होऊ शकतो
By admin | Published: May 20, 2016 11:06 PM