सावंतवाडी: माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर झालेला हल्ला हा शिवसैनिकांनी केला की अन्य कोणाकडून करवून घेतला ? याचा तपास पोलीस करतीलच पण शिवसेनेची सभा सुरू असताना त्या मार्गाने जाणे ही सामंत यांची चूकच होती. पोलिसांकडून तशी सूचना देण्यात आली होती असे असताना ते गेलेच कसे याची पोलिसांकडून चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केली. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परुळेकर म्हणाले, सामंतांच्या गाडीवर झालेला हल्ला हा खरा होता, की सहानभुती मिळवण्यासाठी होता ? याचा उलट तपास करणे गरजेचे आहे. सभा असताना देखील ते गर्दीत गेलेत कशासाठी ? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांचे हे केविलवाणे प्रयत्न सुरू असल्याची टोला लगावला.परुळेकरांनी यावेळी केसरकरांवरही जोरदार हल्लाबोल चढवला. केसरकर संत नाही तर ते संधी साधू आहेत. त्यांनी स्वतःचा फायदा बघून आतापर्यंत अनेक पक्ष बदलले. आणि आपल्यावर झालेले उपकार विसरून त्यांच्या विरोधातच आपल्या भूमिका मांडून स्वार्थ साधून घेतला. त्यांच्यासाठी शिवसेनेने निष्ठावंताना बाजूला ठेवून पदे दिली.चांद ते बांदा योजना अमलात आणली. मात्र ती कितपत यशस्वी केली याचे उत्तर त्यांनीच जनतेला द्यावे. चष्म्याचा कारखाना, काथ्या उद्योग, सेट-अप बॉक्स अशा त्यांच्या विविध फसव्या घोषणा, आता जनतेने ओळखल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता कुणीही बळी पडणार नाही, असा टोला लगावला.राजीनामा देऊन अपक्ष निवडून येऊन दाखवावेकेसरकर पक्षाच्या चिन्हावर नाही तर स्वतःच्या हिमतीवर निवडून येतो, असे सांगतात. मग त्यांच्यात इतकीच धमक असेल तर त्यांनी स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा देऊन अपक्ष निवडून येऊन दाखवावे, कुठच्याच पक्षाच्या चिन्हाची अपेक्षा ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.
यावेळी या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, शब्बीर मणियार, गुणाजी गावडे, शैलेश गवंडळकर, योगेश नाईक, अजित सांगेलकर, विशाल सावंत आदी उपस्थित होते.