सावंतवाडी : निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली वादात सापडली आहे. स्थानिक आमदारांच्या नावाचा गैरवापर करून ही प्रक्रिया राबविण्यात आली, असा आरोप पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी केला.दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत मंगळवारी पंचायत समितीच्या सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची विशेष बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपसभापती शीतल राऊळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय नांद्रेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, संदीप नेमळेकर, तालुका आरोग्याधिकारी वर्षा शिरोडकर, आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने रुजू झालेल्या संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली कोणत्या कारणासाठी करण्यात आली? असा जाब उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
मात्र, त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत, असा आरोप करीत याबाबत तालुका प्रशासनाला किंवा स्थानिक आमदारांना कोणती माहिती न देता हा प्रकार घडतो हे चुकीचे आहे, अशी नाराजी सभापती मानसी धुरी यांनी व्यक्त केली. सावंत पुढे म्हणाले, संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची झालेली बदली ही अंतर्गत राजकारणातून आहे.