कणकवली: सिंधुदुर्गात जलजीवन मिशनची कामे करणारे ठेकेदार हे विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत. मात्र, आमदार नितेश राणे यांनी उद्धवसेनेचे कार्यकर्ते असलेले ठेकेदार रामदास विखाळे यांच्याच कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जनतेबाबत आस्था असेल तर पक्ष न पाहता अपूर्ण कामे ठेवणाऱ्या सर्व ठेकेदारांची चौकशी करून त्यांनी येत्या दहा दिवसात कामांचा आढावा घेऊन दाखवावा. अन्यथा उद्धवसेनेच्या माध्यमातून सर्व ठेकेदारांची यादी जाहीर केली जाईल. असा इशारा उद्धवसेनेचे कणकवली विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.कणकवली विजय भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक ,धीरज मेस्त्री,सिध्देश राणे उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, कणकवली तालुक्यामध्ये वरवडे, कलमठ, गांधीनगर अशा विविध गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामे सुरू आहेत. यामध्ये गांधीनगर, कलमठ या गावातील जलजीवनची कामे पूर्ण झालेली नाहीत. परंतु या अर्धवट असलेल्या कामांची चौकशी न करता रामदास विखाळे यांनी ९० टक्के कामे पूर्ण केली असून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी करणे म्हणजे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रकार आहे. कोणतीही विकास कामे ही जनतेच्या कराच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे भाजपचा किंवा उद्धवसेनेचा ठेकेदार म्हणून त्याच्याकडे न पाहता सरसकट सर्वांच्याच कामाची चौकशी करा.कासार्डे, लोरे परिसरामध्ये सिलिका मायनिंगचा अनधिकृत व्यवसाय गेली काही वर्षे सुरू आहे. आकसापोटी आम्ही कोणाबाबत अद्यापपर्यंत तक्रारी केलेल्या नाहीत. मात्र, नितेश राणे यांनी संजय आग्रे यांच्याबाबत तक्रार करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला लावली. मात्र, या व्यवसायामध्ये सर्वाधिक भाजपचेच कार्यकर्तेच आहेत. त्यांच्यावरही कारवाई व्हावी.अशी मागणी आम्ही करणार आहोत.खऱ्या अर्थाने नितेश राणे यांनी जनतेच्या हिताची कामे करणे गरजेचे होते. करूळ घाट गेले काही महिने बंद आहे. या कामासाठी जो ठेकेदार नेमण्यात आला होता, त्याला तो ठेका मिळू नये म्हणून नितेश राणे यांनी दबाव आणला होता. आता हा घाट गेले सात, आठ महिने बंद असतानाही राणे गप्प का आहेत? याबाबतही वैभववाडीच्या जनतेने विचार करावा. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. आयुष्यमान भारत या योजनेचा फायदा सर्वसामान्यांना होत नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. मात्र, याकडे नितेश राणे यांचे दुर्लक्ष आहे. असेही यावेळी सावंत म्हणाले.
जलजीवन मिशनची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करा, अन्यथा..; उद्धवसेनेचे सतीश सावंतांनी दिला इशारा
By सुधीर राणे | Published: July 15, 2024 5:40 PM