कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारण विभागामध्ये ठेकेदारांची प्रचंड दादागिरी चालली आहे. याकामांमध्ये मोठी साखळी कार्यरत असून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण तक्रार करणार आहोत. तसेच त्या कामांची सखोल चौकशी करत कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. भाजप कार्यालय येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राजन तेली म्हणाले, राज्यात दरवर्षी १० ते १२ हजार कोटी जलसंधारण कामांसाठी खर्च होतात. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ नव्याने निविदा निघाल्या होत्या. ३००-३५० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत. जलसंधारण विभागात स्वतःचे वर्चस्व निर्माण करीत काही ठेकेदार काम करतात. धरण बांधतात, पण तेथील भूसंपादन होत नाही. शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळत नाहीत. हा सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे.सावडाव येथे २०१० साली धरण झाले. आता त्याची दुरुस्ती केली जात आहे. करंजे, कुंभवडे, वर्दे, आंब्रड, शिरवल या धरण प्रकल्पांचे काम सुरू असले तरी तेथील भूसंपादन आजही झालेले नाही. याला जबाबदार कोण? जलसंधारणची कामे होतात, मात्र, त्यांचे ऑडिट झाले पाहिजे अशी मागणीही करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व अन्य धरण प्रकल्प आहेत.त्या तालुक्यात अजून ५-६ प्रकल्प होत आहेत. त्यांचा काय उपयोग ? त्यामुळे पैशाची लयलूट थांबली पाहिजे.गरज नसलेल्या ठिकाणीही ठेकेदार कामे काढतात.याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही तेली म्हणाले.
"जलसंधारणच्या कामांची सखोल चौकशी करा, ठराविक ठेकेदारांची दादागिरी"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 2:26 PM