राहुल किंवा प्रियंका गांधी यांना सभेचे निमंत्रण -नवीनचंद्र बांदिवडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:28 PM2019-04-09T18:28:44+5:302019-04-09T18:30:42+5:30
लढत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातच होणार असे चित्र असले, तरी मतदार संघात मला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. माझ्या प्रचार सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी किंवा महासचिव प्रियंका गांधी
सावंतवाडी : लढत शिवसेना व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांच्यातच होणार असे चित्र असले, तरी मतदार संघात मला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. माझ्या प्रचार सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी किंवा महासचिव प्रियंका गांधी यांना निमंत्रित करण्यात आले असून, याबाबत लवकरच निर्णय होईल. तशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे केली आहे, अशी माहिती काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी दिली.
ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी मंगळवारी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन प्रचार सभा घेतल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, राजू मसूरकर, प्रेमानंद देसाई, काका कुडाळकर, अॅड. दिलीप नार्वेकर, काशिनाथ दुभाषी, महेंद्र सांगेलकर, बाळा जाधव, उदय भोसले, अगस्तीन डिसोझा, विभावरी सुकी, राघवेंद्र नार्वेकर, संदीप सुकी आदी उपस्थित होते.
बांदिवडेकर म्हणाले, मी संपूर्ण मतदार संघात फिरत असून, जरी आम्ही कुठेही चर्चेत नसलो, तरी मतदारांना जीएसटी, नोटबंदी यांच्यावर प्रचंड राग असल्याने तो राग मतपेटीतून व्यक्त होत आहे आणि त्यातच महाराष्ट्र स्वाभिमान व शिवसेना हे दोन्ही पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून प्रचार करत आहेत. त्यामुळे जनता या दोघांनाही नाकारेल, असा आशावादही यावेळी बांदिवडेकर यांनी व्यक्त केला आहे.
भंडारी समाजात कुठेही गट-तट नाही. काही जणांनी वेगळी भूमिका घेतली असली, तरी त्यांनी त्या-त्या पक्षाचे मीठ खाले आहे. त्यामुळे त्यांना तशी भूमिका घ्यावी लागत असेल. पण अखंड भंडारी समाज आपली काय ताकद आहे ती दाखवून देईलच, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
मतदार संघात अनेक विकासकामे झाली नाहीत. फक्त सत्ताधारी घोषणांचा पाऊस पाडत आहेत. त्यांना या निवडणुकीत जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात प्रचार किंवा रोड शोसाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी किंवा महासचिव प्रियंका गांधी यांना बोलवावे, असे सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभा रत्नागिरीत होतील. तसे नियोजन सुरू आहे, असेही यावेळी बांदिवडेकर यांनी सांगितले.