कणकवली : सत्ताधारी आणि प्रशासन आमच्या विरोधात काम करत आहे. हल्लाप्रकरणात विनाकारण आमदार नितेश राणे यांना गोवण्यात आले आहे. केवळ खरचटले त्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व इतर अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात, याचाच अर्थ दबावाखाली पोलीस काम करत आहेत, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली.
राणे म्हणाले, आमदार राणे यांचा कोणताही संबंध नसताना गुन्हे दाखल केले गेले आहेत, आम्ही त्याविरोधात लोकशाही पद्धतीने कायदेशीर लढाई लढणार आहोत. मी देशाचा केंद्रीय मंत्री आहे, नितेश राणे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही मैदान सोडून पळणार नाही. नितेश राणे कुठे आहेत हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का? अशी संतप्त प्रतिक्रिया पत्रकारांच्या प्रश्नावर राणे यांनी व्यक्त केली.
नितेश राणे यांना शोधण्यासाठी हेच पोलीस माझ्या रुग्णालयात पोहोचले. त्या ठिकाणी माझी पत्नी बसली होती, त्या कार्यालयात जाऊन नीतेश राणे कुठे आहेत? अशी विचारणा केली. रुग्णालयामध्ये रुग्ण असतात. तेथील काही खोल्या उघडून दाखवा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राणे यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे पथक गोव्यात दाखल झाले आहे. आमदार नितेश राणे व संदेश सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावरही सरकारी वकिलांचा युक्तिवाद चालूच असल्याने या प्रकरणावर बुधवारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे.
‘मार खाऊन आलेल्यांचा सत्कार होतो’राणे म्हणाले, ज्याने मार खाल्ला, जो मार खाऊन आला.. त्याचा सत्कार केला जातो.. आणि तोदेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, याबाबत काय सांगावे? म्हणजेच तीन पक्षांचे सरकार कशा पद्धतीने चालते हे दिसून येत आहे. सत्तेचा आणि कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे. कणकवलीत ज्या पद्धतीने भयानक घटना घडली. असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर दाखविण्याचे काम प्रशासन करत आहे, असा आरोपही राणे यांनी केला.