कणकवली: कणकवली तालुक्यातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन मिळाले आहे. त्यामुळे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 'आयएसओ'मुळे ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार आणि गावाचा विकास गतिमान होणार आहे.शासननियुक्त संस्थेमार्फत अनेक ग्रामपंचायतींची 'आयएसओ' मानांकनासाठी तपासणी झाली होती. त्यामध्ये सुसज्ज इमारत, अद्ययावत कार्यालय,स्वच्छता, मालमत्तेचे विवरण, दैनंदिन लेखे, भौतिक सुविधा अशा विविध बाबी तपासण्यात आल्या होत्या. मंगळवारी कलमठ ग्रामपंचायत कार्यालयात आयएसओ मानांकन प्रमाणपत्र संस्थेचे सहदेव चव्हाण यांच्या हस्ते कलमठ ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.ग्रामपंचायत कामात सुसूत्रता, कार्यालय दफ्तर वर्गीकरण, सर्व समित्या, कर्मचारी काम वर्गवारी, पार्किंग, शासनाच्या योजना माहिती, दिशादर्शक, नामफलक अशा अनेक बाबींच्या पूर्तता करून ग्रामपंचायत स्थापने पासूनचे ५० वर्षाचे सर्व रेकॉर्ड अपडेट करण्यात आले असून त्या रेकॉर्डचे विलगीकरण करणे या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. यासाठी गेले सहा महिने ग्रामपंचायत काम करत होती. ग्रामपंचायतीच्या सर्व टीमच्या मेहनतीने हे शक्य झाले असून या पुढे गावातील सर्व शाळा व अंगणवाड्या आयएसओ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पंचायत समितीचे माजी उपसभापती संदिप मेस्त्री यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्राम विकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र यादव, नितीन पवार, दिनेश गोठणकर, श्रेयस चिंदरकर, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, प्रिती मेस्त्री, हेलन कांबळे, नजराना शेख आदी उपस्थित होते.
Sindhudurg: कलमठ ग्रामपंचायतीला 'आयएसओ' मानांकन; विकास प्रक्रियेला गती येणार
By सुधीर राणे | Published: March 12, 2024 4:42 PM