सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी तसेच इस्टर संडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी ६ एप्रिल रोजी ८ वाजल्यापासून ते २० एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे, अशी माहिती बुधवारी प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली. या पत्रकात म्हटले आहे की, या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीची किंवा मृतदेह किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, आवेशपूर्ण भाषण करणे अगर हावभाव करणे अगर सोंग आणणे अशी चित्रे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकात प्रसार करणे, पाच अगर पाचपेक्षा जादा लोकांनी एकत्र जमा होणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे आदींबाबत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना या संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न आदी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यास लागू पडणार नाही. या आदेशाचा जो कोणी उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही जिल्हा दंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश जारी
By admin | Published: April 02, 2015 1:06 AM