कणकवली : महिलांनी स्वतःवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नये. कोणताही प्रसंग समोर आला तरी त्याला धैर्याने तोंड देवून जिद्दीने आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत रहावे. जगात अशक्य असे काहीच नसते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते, असे प्रतिपादन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी येथे केले.अनेक महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या जीवनाची पुढील वाटचाल करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी वैशाली राजमाने यांनी काही महत्वाच्या ' टिप्स' यावेळी दिल्या. त्या म्हणाल्या, महिला कोणत्याही उच्च पदावर चांगले काम करू शकतात, हे माझ्या स्वानुभवावरून मी सांगते. लहानपणापासून मोठ्या अधिकारी पदावर काम करायचे स्वप्न मी बघितले होते. ते आता पूर्ण झाले आहे.
अजूनही प्रशासकीय सेवेत मला मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर महिलांनीही मोठी स्वप्ने बघावीत. त्यासाठी योग्य नियोजन करावे आणि आवश्यक ते शिक्षण घ्यावे, वाचन करावे. असे झाल्यास आपल्यापासून यश दूर नाही. फक्त उच्च शिक्षण घेऊन चालणार नाही. तर आपल्याला जीवनात नेमके काय बनायचे आहे ? हे प्रथम ठरवावे लागेल. तसेच त्यादृष्टीने वाटचाल करावी लागेल.तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलात तरी आपल्या कामाशी प्रामाणिक राहून चांगले काम केले तर यश निश्चित मिळते. शिक्षकी पेशा मध्ये काम करताना दररोज एकसुरी काम करन्याचा आपल्याला कदाचित कंटाळा येऊ शकतो. अर्थात त्या क्षेत्रातही विविध विषयांवर संशोधन करू शकतो.मात्र, प्रशासकीय सेवेत विविधांगी विषय हाताळावे लागत असल्याने दिवसेंदिवस आपले व्यक्तिमत्वही बदलत जाते. प्रगल्भता वाढते. सर्वांगीण विकास होतो. सामान्य जनतेसाठी काही तरी रचनात्मक काम केल्याचे मिळणारे समाधान, आनंद यापेक्षा आपल्याला आणखीन काय हवे असते. त्यामुळे मुलींनी प्रशासकीय सेवेत बिनधास्त यावे.
आपल्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घ्यावी. आपल्या गावाबरोबरच जिल्ह्याचे ,राज्याचे , कुटुंबियांचे नाव रोशन करावे आणि समाधान मिळवावे. असेही वैशाली राजमाने यांनी यावेळी सांगितले.त्या म्हणाल्या , एम. एस. सी.( फिजिक्स) व एम. एड. पर्यंतचे शिक्षक मी घेतले. माझे आई, वडील तसेच पती व इतर कुटुंबीय यांना मी मोठ्या पदावर काम करतानाच जनसेवा करावी असे नेहमी वाटत असे . त्यानी तसे बोलूनही दाखविले होते. आपल्यातील ' टॅलेंट' चा वापर कर असे ते मला सांगत असत. वेळोवेळी त्यांचे प्रोत्साहन लाभल्याने सन १९९९ मध्ये लोकसेवाआयोगाची परीक्षा मी उत्तीर्ण झाले. माझ्या परिश्रमाना यश आले.त्यानंतर सन २००१ मध्ये सातारा तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पदी मी रुजू झाले. प्रशासकीय सेवेतील या प्रारंभानंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच खटाव व पुणे येथे काम करण्याची संधी मिळाली.
हातकणंगले येथे तहसीलदार म्हणून काम केल्यानंतर कणकवली येथे प्रांताधिकारी पदावर नियुक्ती झाली . त्यामुळे आता प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करत असताना आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा वापर करून जनसेवा करायला मिळत असल्याबाबत समाधान वाटते. असेही त्या म्हणाल्या .