कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्ताधारी सर्व बाबींमध्ये राजकारण करण्यात दंग आहेत. तर प्रशासन सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाने कोरोनाच्या संकट काळात स्वखर्चातून गरजूंपर्यंत मदत पोहचवली. मात्र, शासकीय खर्चातून केलेल्या मदतीची छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवीत त्याचे फुकटचे श्रेय घेणे शिवसेनेच्या नेत्यांसाठी अशोभनीय आहे अशी टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे केली.कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री , कणकवली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर आदी उपस्थित होते.यावेळी राजन तेली म्हणाले, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर केंद्र व राज्य नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने सिंधुदुर्गात अनेक सेवाभावी कामे केली. ५५ हजार लोकांपर्यंत विविध प्रकारची मदत पोचविली. तसेच जनता आत्मनिर्भर होण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत.२० लाख होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आमदार नितेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने भाजपाने जिल्ह्यात केले. अलीकडेच झालेल्या जिल्हापरिषदेच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून होमिओपॅथी गोळ्या अजून खरेदी केल्या नसल्याचे स्पष्ट केले. मग सत्ताधाऱ्यांनी होमिओपॅथी गोळ्या वाटपाची जी छायाचित्रे काढून प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली त्या गोळ्या कोठून आल्या ? असा सवाल राजन तेली यांनी यावेळी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले, आमदार नितेश राणे,आमदार रवींद्र चव्हाण व भाजपाच्या माध्यमातून १५ टन हळद बियाणे वाटप करण्यात आले. तर सत्ताधारी आमदार व नेते चांदा ते बांदा योजनेतून हळदवाटप करून पत्रकबाजी करीत आहेत . त्यांनी असे करण्यापेक्षा जिल्हावासीयांसाठी ठोस असे काही तरी काम करावे.सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले शिवसेनेचे आरोग्यमंत्री गेली पाच वर्ष पदभार सांभाळत होते. मात्र , तरीही सिंधुदुर्गात आरोग्य व्यवस्था ढेपाळलेलीच आहे. अनेक पदे रिक्त आहेत. निदान आता तरी त्यांनी आरोग्य व्यवस्था सुधारावी.जिल्हयात १६ हजार २८० टन खताची मागणी असताना फक्त ७ हजार टन खत उपलब्ध झाले आहे.
केंद्र सरकार खत द्यायला तयार आहे. मात्र सत्ताधारी आणि जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना खत उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अनेक खरेदीविक्री संघाचे पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तर शेतकऱ्यांनी खता अभावी काय करायचे ? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. पालकमंत्र्यांनी आता तरी या समस्यांकडे लक्ष द्यावे.असेही राजन तेली यावेळी म्हणाले.मल्टिव्हिटॅमिन बी ज्युसचे वाटप !तातू सीताराम राणे ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गात ३५ हजार लोकांना आरोग्यवर्धक मल्टीव्हिटॅमिन बी ज्यूसचे वाटप करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवत आरोग्य जपणे आवश्यक आहे.
रूग्णालयात उपचार घेत असलेल्या तसेच संस्थात्मक क्वॉरंटाईन असलेल्या लोकांना या मल्टीव्हिटॅमिनची असलेली गरज ओळखून माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हे मल्टीव्हिटॅमिन बी ज्यूस उपलब्ध करून दिले आहे.भाजपच्या वतीने त्याचे वाट केले जाणार आहे. भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यात जिल्हा परिषद मतदार संघ निहाय 'मल्टीव्हिटॅमिन बी' चे वाटप केले जाणार आहे.असे यावेळी राजन तेली यांनी सांगितले.