सावंतवाडी : खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळा सरकार ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याबाबत फक्त चर्चा झाली असून निर्णय झाला नाही. त्यामुळे कोणी गैरसमज पसरवू नये असा खुलासा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यानी बुधवारी मुंबई येथून सावंतवाडीतील पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल सरकारला कोणताही धोका नाही असा विश्वास ही व्यक्त केला.खासगी शिक्षण संस्थाच्या अनुदानित शाळा ताब्यात घेण्याचा सरकारचा विचार आहे. तसे वक्तव्य मंत्री केसरकर यांच्याकडून अधिवेशनात करण्यात आले होते. त्यावरून महाराष्ट्रातील अनेक संस्था चालकांनी केसरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकारांसमोर या विषयावर भाष्य केले. सरकार खासगी शाळा चालवायला घेणार असल्यासंदर्भात कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही त्या संदर्भात फक्त चर्चा झाली असून काही हालचाली ही नाहीत. त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नयेत असे आवाहन ही मंत्री केसरकर यांनी यावेळी केले.शिवसेना भाजप युतीचे सरकार लवकरच पडेल असे विरोधकांना वाटते पण आमचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही आमच्या बाजूने लागेल असा विश्वास ही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.
'ती' फक्त चर्चा, गैरसमज पसरवू नये; शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा खुलासा
By अनंत खं.जाधव | Published: March 22, 2023 7:06 PM