रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांत रत्नागिरीत पक्ष संघटनेला महत्व देण्यापेक्षा ते एका व्यक्तीला दिले गेले हे खरे आहे. अशी व्यक्ती अचानकपणे दुसऱ्या पक्षात गेल्यानेच पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम झाला. पक्षाचे नुकसान करणारे, विश्वासघात करणारे उदय सामंत पक्षात राहून कुरबुरीच करीत राहिले असते. ते पक्षातून गेले हे चांगलेच झाले, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी येथे आज पत्रकारपरिषदेत बोलताना लगावला. कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसात पक्षाने चांगली मुसंडी मारली आहे. पक्ष बळकट करण्यात यश येत आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी सुरू आहे. जे फुटिरांबरोबर गेले, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत पुन्हा येत आहेत, असे ते म्हणाले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव व संजय कदम हे दोन आमदार आहेत. त्यांचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. आता रत्नागिरीसह अन्य मतदारसंघातही संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. भास्कर जाधव व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात अजून मनोमिलन झाले नाही काय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, काहीवेळा किरकोळ मनभेद असतात, ते मिटले. त्यांच्यात मतभेद नाहीत. रत्नागिरी पालिकेच्या ४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला दोन प्रचारसभांमध्ये ते एकाच व्यासपीठावर होते, असेही निकम म्हणाले. (प्रतिनिधी)तटकरे-जाधव २० नंतर रत्नागिरीतप्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव यांना येत्या २० डिसेंबरनंतर संघटनात्मक बांधणीसाठी रत्नागिरीत एकाच व्यासपीठावर आणणार असल्याचे सूतोवाच निकम यांनी केले. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना चांगलीच चपराक बसेल, असे निकम म्हणाले. कदम जाणार उच्च न्यायालयातयेथील न्यायालयाने आमदार संजय कदम यांना शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्याविरोधातील आव्हान याचिका आमदार कदम हे लवकरच उच्च न्यायालयात दाखल करणार आहेत. पक्ष त्यांच्या पूर्णत: पाठीशी असल्याचेही निकम यांनी स्पष्ट केले.
सामंत पक्षाबाहेर पडले हे चांगलेच झाले
By admin | Published: December 07, 2015 10:33 PM