लांजा : तालुक्यातील कोचरी वावळ्याचा माळ येथे अॅक्टिव्हाच्या अपघातामध्ये जागीच ठार झालेली वर्षा सुधीर गुरव (११) ही पाचवीमध्ये शिक्षण घेत होती. वर्षा ही अतिशय हुशार तसेच क्रीडा स्पर्धेत नेहमीच उत्साहाने सहभागी व्हायची. चुणचुणीत असल्याने ती शाळेतील कार्यक्रमात नेहमीच पुढे असे. १ जानेवारी रोजी तिची माळवण येथे सहल जाणार होती. मात्र, तिचे सहलीचे स्वप्न अधुरेच राहिले. गुरुवारी ती साखरपा येथे वडिलांबरोबर खरेदीसाठी गेली होती. सकाळी १० वाजण्याच्या दम्यान परतीच्या प्रवासाला गाडी नसल्याने वर्षाच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या साखरपा येथील लादी कारागीर महेंद्रकुमार चौधरी (मूळ जयपूर) यांच्या अॅक्टिव्हा मोटारसायकलवरुन ते पुर्ये मार्गे कोचरी येथे घरी येत असताना उतारावरील यु आकाराच्या अपघाती वळणावर गाडीवरील ताबा सुटला आणि मोटारसायकल उंच दरीच्या मुख्य रस्त्यापासून ८ फुटावर जावून अडकली. यामध्ये वर्षाचे वडील २५ फूट दरीत जावून कोसळले. तसेच वर्षा ही गाडीच्या शेजारीच दगडावर जाऊन आपटल्याने जागीच मयत झाली तर दुचाकी चालक चौधरी जखमी झाला.या अपघातातील मयत वर्षा हिने नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये खो - खो कॅप्टन म्हणून कामगिरी बजावली होती. आई-वडिलांची परिस्थिती हलाखीची होती. १ जानेवारी रोजी शाळेची शैक्षणिक सहल असल्याने व गुरुवारी सुटी असल्याने ती आपल्या वडिलांबरोबर खरेदीसाठी गेली होती. मात्र, अपघातामध्ये ती मरण पावली. वर्षा हिचे सहलीचे स्वप्न मात्र यामुळे अधुरेच राहिले आहे. शिक्षण घेऊन आई-वडिलांचे हलाखीचे जीवन तिला सुधारायचे होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळाच विचार सुरु होता. नियतीने घाला घालून अल्पवयातच तिला हिरावून नेले. (प्रतिनिधी)वडिलांना अखेरचे दर्शनही नाही...!वर्षाचे वडील गंभीर जखमी असल्याने रत्नागिरी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने ते आपल्या लाडक्या मुलीचे अखेरचे दर्शनही घेऊ शकले नाहीत. ते अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. अतिशय दुखद अं:तकरणाने वर्षाचा अंतविधी करण्यात आला.
सहलीचे स्वप्न अधुरे ठेवूनच ती गेली...!
By admin | Published: December 25, 2015 10:41 PM